कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन आगामी निवडणुकांची रणनीती – निवृत्ती सांगवे
उदगीर (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एम आय एम चे नेते खा. इम्तियाज जलील, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे), एम आय एम चे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक ताहेर हुसेन,फैयाज शेख आणि एम आय एम चे प्रमुख पदाधिकारी यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. एम आय एम सोबत आगामी निवडणुकांमध्ये सहभागी होऊन मित्र पक्ष म्हणून निवडणूक लढवायची किंवा स्वबळावर निवडणूक लढवायची. यासंदर्भात राष्ट्रीय दलित अधिकार मंचने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसून कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांची मते आजमावूननच आगामी निवडणुकांची रणनीती ठरवणार. अशी भूमिका राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी जाहीर केली आहे. गेल्या निवडणुका एम आय एम सोबत आघाडी करून बऱ्यापैकी यश संपादन केले होते. याच पार्श्वभूमीवर दलित – मुस्लिम समाजाच्या मताच्या पाठबळावर कोणती भूमिका घ्यावी? यासंदर्भात लवकरच कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याचेही निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी जाहीर केले आहे. फक्त नगरपालिकाचे नव्हे तर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका मध्ये राष्ट्रीय दलित अधिकार मंच सक्रियपणे उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी खा. इम्तियाज जलील यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षसंघटन वाढीसाठी लोक कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. जेणेकरून मतदारांपर्यंत जाताना आपल्या सोबत समाजकार्याची शिदोरी असावी असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम आय एम जिल्हाध्यक्ष ताहेर हुसेन यांनी केले. संघटितपणे निवडणुका लढल्यास यश हमखास मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.