आनंद उत्सव साजरा करताना इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या – पोलिस अधीक्षक मुंडे
उदगीर (एल.पी. उगीले) सण, उत्सव साजरे करत असताना आनंदाने साजरे करा. मात्र त्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याचीही दक्षता घ्या. कारण संवेदनशील काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेत असते. त्यामुळे सर्वांनी उत्सव साजरा करताना कायद्याचे पालन करावे. समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करावी, विशेष करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच रमजान ईद साजरी करत असताना, प्रभू श्री रामचंद्राची प्रभू श्री रामचंद्राची मिरवणूक काढताना आपल्या अतिरेकी उत्साहामुळे समाजातील इतर घटकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले आहे.
येणाऱ्या काळातील सण आणि उत्सव विचारात घेऊन उदगीर येथील परमेश्वरी मंगल कार्यालयामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख, उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर, महावितरणचे कार्यकारी अभियंता सायस दराडे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करण सोनकवडे इत्यादींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, मिरवणुकीमध्ये मोठमोठे बँड आणि डॉल्बी लावून वाजत गाजत मिरवणूक काढण्यापेक्षा समाजातील इतर घटकांना प्रेरणा देणारे देखावे साजरे करा. समाज उपयोगी उपक्रम हाती घ्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा नव्या पिढीला द्या, आणि या काळात शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्या. जर कोणी कायद्याचे उल्लंघन करत असेल तर नाईलाज म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई केली जाईल. यापूर्वीच पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांना नोटीसा देऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. इतर विद्यार्थी किंवा तरुणांनी अतिउत्साह दाखवून ध्वनी प्रदूषण करू नये, इतरांना त्रास देऊ नये. असेही आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे म्हणाले की, रमजान ईद साठी इदगा मैदानावर आवश्यक त्या सुख सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व प्रभू रामचंद्र यांच्या मिरवणुकीसाठी शहरातील मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी पिण्याचे पाणी व आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्वांनी शांततेच्या मार्गाने सर्व सण, उत्सव साजरे करावेत. असे आवाहन केले. याप्रसंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने इतरही पोलीस अधिकाऱ्यांनी आपले मनोगत आणि सूचना सांगितल्या.