हुक्का व ई सिगारेटचे सेवन म्हणजे कर्क रोगाला आमंत्रण!
या विषयावर महादेव खळुरे यांचा आकाशवाणीवर संवाद!
अहमदपूर (गोविंद काळे) : ३१ मे जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या औचित्यांने परभणी आकाशवाणी केंद्रावरुन दि.३१ मे रोजी सकाळी १० वाजता शालेय मुले व युवकांनी व्यसनापासून दूर रहाण्यासाठी “हुक्का व ई सिगारेट चे सेवन म्हणजे कर्क रोगाला आमंत्रण! या विषयावर यशवंत विद्यालयातील राज्यपुरस्कार प्राप्त कला शिक्षक महादेव खळुरे यांनी युवकांसाठी संवाद साधला आहे.
युवकांना तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन हे शालेय व महाविद्यालयीन जीवनातच जडत असते. अनेक जाहिरातीतून मुलांना व्यसनाकडे आकर्षित करुन घेतले जात आहे. साधी सुपारीपासून ते गुटख्यापर्यंतचा प्रवास हे शालेय जीवनात सुरु होतो. हे व्यसन लागू नये म्हणून शासन स्तरावरून अनेक प्रयत्न केले जातात. शालेय व महाविद्यालय परिसरात
तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री होताना दिसून येते. १३ ते २१ या वयोगटातील विद्यार्थ्यांना व्यसनापासून दुर ठेवण्यासाठी पालक शिक्षक व समाजाने लक्ष देणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन जडले तर ते व्यसन सुटत नाही. समाजातील जेष्ठ व्यक्ती, विविध सामाजिक संघटना अशा युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. शाळेच्या वेळात विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचे लक्ष असते पण शाळाव्यतिरिक्त अन्य
वेळी पालकांनी आपला पाल्य काय करतो, कुणासोबत फिरतो, काय खातो, याकडे लक्ष ठेवले तर मुले व्यसनापासून दूर राहु शकतात. राज्यात सन २०१२ पासून गुटखा विक्रीवर बंदी आहे. तरीही राज्यात सर्रासपणे गुटखा विक्री होताना दिसून येते. गुटख्यामुळे अनेक मुले विविध आजारांनी ग्रासलेले आहेत. तंबाखू मध्ये असलेले हानिकारक रसायने हे शरीरासाठी घातक आहेत. निकोटीन हा रसायन परत-परत व्यसन करण्यास परावृत्त करीत असतो. यामुळे मुले हेकेखोर बनतात, चिडचिड करतात, ताणतणाव वाढतो व आईवडिलांना त्रास देत असताना पहावयास मिळते. सुजान युवकांनी मित्र, नातेवाईक, शेजारी, समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न केल्यास नक्कीच देश व्यसनमुक्त देश बनल्याशिवाय राहणार नाही. अशा गंभीर व राष्ट्रीय समस्येवर महादेव खळुरे यांनी आकाशवाणी परभणी येथून युवकांसाठी संवाद साधला.
वरील उपक्रमाबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर,सचिव डी. बी. लोहारे गुरुजी,उपाध्यक्ष डाँ भालचंद्र पैके,सहसचिव डाँ सुनिता चवळे,प्राचार्य गजानन शिंदे,उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे,पर्यवेक्षक आशोक पेद्देवाड,रामलिंग तत्तापुरे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.