राज्य सरकारच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाचे रास्ता रोको, जेलभरो आंदोलन
लातूर (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या ओबीसीसह सर्वच घटकांच्या आरक्षण विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रविवार दि.४ जुलै रोजी लातूर येथे शिवाजी चौकात रास्ता रोको व जेलभरो आंदोलन केले जाणार आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा आणि गलथान कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. आवश्यक त्या न्यायालयीन बाबींची पूर्तता राज्य सरकारने वेळेवर न केल्याने न्यायालयाने तीन अटींची पूर्तता करेपर्यंत आरक्षणाला स्थगिती दिली आहे.राज्य सरकारचे धोरण आरक्षण विरोधी आहे.त्याचा निषेध करण्यासाठी रविवार दि.४ जुलै रोजी दुपारी १ वाजता लातूर येथे शिवाजी चौकात रास्ता रोको व जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.विष्णू गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे.
राज्य सरकारने इतर मागासवर्ग आयोगाची स्थापना करून न्यायालयीन बाबींच्या पूर्ततेसाठी काम सुरु करावे.ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डाटा तातडीने न्यायालयात जमा करावा.ओबीसी आरक्षणावरील स्थगिती जोपर्यंत उठवली जाणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत,या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा.विष्णू गोरे, जिल्हा संपर्कप्रमुख रामराव रोडे,तालुकाध्यक्ष सुदाम पांचाळ,सतिश बोडके, मल्लिनाथ पांचाळ यांनी केले आहे.