४ सप्टेंबर रोजी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या बुद्ध विहार व अन्य विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना उदगीरचे आमदार तथा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथे भेट घेवुन निमंत्रण दिले होते. त्यानुसार येत्या ३० जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उदगीर दौरा निश्चित झालेला होता मात्र पावसाअभावी सदर दौरा पुढे ढकलण्यात आला होता. त्या अनुषंगाने आता येत्या ४ सप्टेंबर रोजी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे उदगीरला बुध्द विहाराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येत आहेत . त्यांच्या या दौरा संबंधी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे त्या कामाची पाहणी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केली व प्रशानाला उर्वरीत तयारी संबंधी सुचना दिल्या.
उदगीरकरांच्या वतीने राष्ट्रपतींचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी बुध्द वंदना होणार असुन पूज्य भन्ते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत सभा व मार्गदर्शन होणार आहे. यासाठी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा खास वेळ असुन यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्ह्यातील सर्व आमदार व सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिलेले निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारले असुन महामहिम राष्ट्रपतींचा प्राथमिक दौरा प्रशासनाकडे आलेला आहे. त्यानुसार ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नांदेड विमानतळावर येणार आहेत. तेथून हेलिकॉप्टरद्वारे उदगिरात दाखल होणार आहेत. उदगीर शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य – दिव्य अशा बुद्ध विहाराचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयावर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उदगिरात येऊन हेलीपॅड व अन्य तयारीच्या अनुषंगाने पाहणी केली होती. या अनुषगांने क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी या पूर्व तयारीची काल पाहणी केली.
यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, नरेंद्र मेडेवार, एल.डी. देवकर, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, रामचंद्र तिरूके, बाळासाहेब मरलापल्ले, नजीर हाशमी, आदी उपस्थित होते.
या उद्धाटन सोहळ्याला उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.