संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत रेणापुरात शिवसेना पदाधिकार्यांची बैठक
शिवसैनिकांनी संकट काळात जनतेला आधार द्यावा- संपर्क प्रमुख संजय मोरे
रेणापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्या उपस्थितीत रेणापूर येथे शिवसेना पदाधिकार्यांची बैठक संपन्न झाली. सध्या कोरोनाचे संकट असून शिवसैनिकांनी या काळात जनतेला आधार द्यावा,अधिकाधिक लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन मोरे यांनी या बैठकीत बोलताना केले. संपर्कप्रमुख मोरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता रेणापूर येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक घेण्यात आली. नवनिर्वाचित लातूर ग्रामीण जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, लातूर शहर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने,माजी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या तथा जिल्हा महिला संघटक सौ. सुनिता चाळक, उपजिल्हाप्रमुख सचिन दाने, लातूर तालुकाप्रमुख ॲड. प्रवीण मगर, रेणापूर शहर प्रमुख गणपत कोल्हे यांची या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी यावेळी रेणापूर नगरपंचायतची प्रभागनिहाय माहिती संपर्क प्रमुखांना सादर केली.
यावेळी बोलताना संपर्कप्रमुख मोरे म्हणाले की, आगामी नगरपंचायत निवडणूक लक्षात घेता बूथ पातळीवर कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यासाठी काम करण्याची गरज आहे. पदाधिकाऱ्यांनी त्यावर भर दिला पाहिजे.हे काम गतीने व्हावे यासाठी दाधिकार्यांच्या निवडी लवकर होणे आवश्यक असून जिल्हाप्रमुखांसोबत चर्चा करून त्या लवकरात लवकर केल्या जाव्यात, असे आदेशही त्यांनी दिले.
संपर्क प्रमुख मोरे म्हणाले की, पक्ष नव्हे तर संघटना म्हणून शिवसैनिकांनी एकदिलाने काम केले पाहिजे. शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागले पाहिजे.जनता आपल्यासाठी नाही तर आपण जनतेसाठी आहोत याचे भान ठेवून कार्यकर्त्यांनी काम करणे आवश्यक आहे. रेणापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी ठाकरे सरकार कटिबद्ध आहे. आगामी निवडणुकीच्या माध्यमातून रेणापूरकरांनी शिवसेनेला सेवा करण्याची संधी द्यावी. यासाठी तळागाळातील जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी अग्रस्थानी रहावे.कोरोना काळात अधिकाधिक लसीकरण करून घ्यावे,असे आवाहनही त्यांनी केले.
या दौऱ्यात संपर्कप्रमुख मोरे यांनी रेणुकामातेची पूजा केली.पाऊस पाणी चांगले व्हावे,शेतकरी सुखी रहावा, कोरोना संकटातून लवकर मुक्तता व्हावी,यासाठी रेणुकामातेला साकडे घातले. प्रारंभी लातूर ग्रामीण शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन संपर्क प्रमुखांचा सत्कार केला.या बैठकीस अनिल फुलारी, बालाजी कागले, सुधाकर गरड, हणमंत जाधव, चांदपाशा शेख, शंकर कसपटे, कपिल चितपल्ले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.