महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण – निवृत्ती सांगवे (सोनकांबळे)
उदगीर (एल.पी. उगिले) : केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोलियम पदार्थांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.इतर इंधन दरवाढीच्या सोबत घरगुती गॅसच्या किमती मध्ये होत जाणारी वाढ ही गृहिणीचे बजेट कोलमडून टाकायला कारणीभूत ठरते आहे. सर्वच क्षेत्रात महागाई वाढत असून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती देखील आता गरिबांना परवडत नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे, गोरगरिबांचे जगणे कठीण झाले आहे. शासनाने वेळीच याचा विचार नाही केलास, राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने आंदोलन छेडावे लागेल. असा इशारा राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी दिला आहे.
सध्या डिझेल शंभरच्या जवळ आहे. तर पेट्रोलने शंभरी पार केलेली आहे. गॅसचा दर ही दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आहे. एका बाजूला अच्छे दिन म्हणून अशा दाखवून उज्वला गॅसच्या नावाने गॅस दिला खरा, मात्र आता किमती प्रचंड वाढल्यामुळे रिफील करणे शक्य नसल्याने गोरगरीब महिलांनी पुन्हा जळतन, लाकूड, गवऱ्या शोधायला सुरुवात केली आहे. धूर मुक्त घर या संकल्पनेला पूर्णपणे कोलदांडा बसला आहे.
अच्छे दिनचे गाजर दाखवून गरिबांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधामध्ये जनमत तयार होत आहे. लोकांना महागाईच्या खाईत लोटून टाकले जात आहे. अशीही टीका निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे)यांनी केली आहे. मध्यमवर्गीय जनतेला दुचाकीवरून फिरणे देखील परवडत नाही आहे. त्यामुळे कामाच्या गतीला मर्यादा येऊ लागल्या आहेत. अगोदरच कोरोना महामारीच्या कारणाने लॉक डाऊन मध्ये मध्यम वर्गीय होरपळून निघाले आहेत. आणि आता पुन्हा महागाईचा भस्मासुर निर्माण केला जात असल्याने जनतेने जगावे की मरावे? असा प्रश्न पडू लागला आहे. शासनाने त्वरित महागाई कमी करावी. अन्यथा येणाऱ्या काळात जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असेही निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी यावेळी स्पष्ट केले.