मैत्री’ प्रशिक्षणांमधून प्राप्त कौशल्याचा पशुधनातील गर्भधारणा दर वाढवण्यासाठी आणि पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी वापर करा : डॉ. नंदकुमार गायकवाड
उदगीर (प्रतिनिधी) : ‘मैत्री’ प्रशिक्षणांमधून प्राप्त कौशल्याचा पशुधनातील गर्भधारणा दर वाढवण्यासाठी आणि पशुपालन व्यवस्थापनामध्ये सुधारणा करून पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी वापर करावा, असे आवाहन डॉ. नंदकुमार गायकवाड, सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर यांनी केले. ते ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर; पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पशुप्रजनन व स्त्रीरोगशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथे आयोजित ‘ग्रामीण भारतासाठी बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञ’ (MAITRI) प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलत होते. पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील प्रशिक्षण कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अशोक देवांगरे, डॉ. अनिल पाटील, प्रकल्प सह-समन्वयक आणि डॉ. स्नेहल रामटेके, प्रशिक्षण समन्वयक उपस्थित होते.डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये सदर प्रशिक्षण कालावधी दरम्यान घेतलेली व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षणार्थींच्या उत्स्फूर्त सहभागाबाबत माहिती दिली. सदर प्रशिक्षण कार्यक्रमातून कृत्रिम रेतनाबरोबरच पशुआहार, पशुधन व्यवस्थापन, चारा उत्पादन, उत्तम प्रतीचे दूध उत्पादन, पशु आरोग्य व्यवस्थापन याविषयी मिळालेल्या ज्ञानाचा पशुपालनामधील व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी करून पशुपालकांना जास्तीत जास्त नफा कसा मिळेल? यासाठी प्रयत्न करावा. असे मत डाॅ. नंदकुमार गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले. या प्रशिक्षणामध्ये लातूर व नांदेड जिल्ह्यातील ३० सुशिक्षित बेरोजगार तरुण सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रफुल्लकुमार पाटील प्रशिक्षण सहसमन्वयक यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.