महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील नगर परिषदेचे माजी सदस्य, साहित्य, संगीत कला अकादमी तथा सम्राट अशोक मित्रमंडळाचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी हे महात्मा फुले महाविद्यालयातील दूर शिक्षण विभागांतर्गत एम.ए. लोकप्रशासन या विषयात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा महात्मा फुले महाविद्यालयात भव्य सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार तथा शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि महाविद्यालयाचा ‘ असूड ‘ वार्षिक विशेषांक भेट देऊन डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सातत्याने गुणवत्तेचा झेंडा फडकवून महात्मा फुले महाविद्यालयाने अहमदपूरची शान वाढवली आहे, याचा अहमदपूरकरांना अभिमान आहे. या महाविद्यालयाने गुणवत्ते बरोबरच पर्यावरण संरक्षण, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही अहमदपूरचे नाव उंचावले आहे. प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले महाविद्यालयाने केलेली प्रगती ही मराठवाड्याला ललामभूत ठरणारी असून, या महाविद्यालयाला निश्चितच उज्ज्वल भवितव्य आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांच्या ‘नाही रे ‘ वाल्यांसाठी, दीन , पतीत, वंचितासाठीच्या सामाजिक कार्याचा यथोचित गौरव करत, त्यांना पुढील सामाजिक – राजकीय वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रकाश चौकटे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.सचिन गर्जे यांनी केले तर आभार डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.