केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर मांडावा म्हणून ही जन सन्मान यात्रा काढली आहे- उप- मुख्यमंत्री अजित पवार
अहमदपूर (गोविंद काळे) : महिलांना आर्थिक सक्षम करणे व त्यांचा सन्मान वाढवणे हा आमच्या सरकारचा हेतू असून यामुळेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर मांडावा म्हणून ही जन सन्मान यात्रा काढली आहे असे मत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
शहरातील जिजाऊ फन्क्शन हॉलमध्ये आयोजित जन सन्मान यात्रा निमित्त आयोजित कार्यक्रमात बुधवारी (ता.28) ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे अध्यक्षस्थानी तर मंचावर क्रीडामंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष अफसर शेख, सुरज चव्हाण, व्यंकटराव बेद्रे, शिवानंद हेंगणे, जिल्हाध्यक्षा मीनाक्षी शिंगडे, माजी नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे, माजी नगरसेविका अनुराधा नळेगावकर, तालुकाध्यक्षा शाहू कांबळे, दर्शना हेंगणे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले सध्याचे राज्य सरकार हे सर्वसामान्य सरकार असून आम्ही काढत असलेल्या जनसन्मान यात्रेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना फसवी असून फक्त येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणल्याचे बोलले गेले, परंतु ही योजना कायमस्वरूपी असून भविष्यात बंद होणार नाही अशी ग्वाही दिली परंतु असे होण्यासाठी आम्हाला मतदान करावे असेही यावेळी अजित पवार म्हणाले.
आमदार बाबासाहेब पाटील यांनी मतदार संघाच्या विकासासाठी सुमारे 2 हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी आणला असून यामुळे मतदार संघाचा मोठा विकास झाला आहे. केंद्राच्या विचाराचे राज्यात सरकार असेल तर राज्याला अधिकचा निधी मिळतो व राज्याचा विकास होतो. महिलावर अत्याचार करणे हा अक्षम्य गुन्हा असून अशा घटनेतील आरोपी बाबत सरकार गंभीर आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण चालू असताना सकल मराठा समाज बांधवांनी जिजाऊ फंक्शन हॉलच्या गेट समोर आरक्षण संदर्भात विविध घोषणा दिल्या, यावेळी पोलिसांनी त्यांना त्याच ठिकाणी रोखून धरले.