मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लातुराती ३६ हजार महिलांचे अर्ज मंजूर : प्रेरणा होनराव
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लातुराती ३६ हजार महिलांचे अर्ज मंजूर : प्रेरणा होनराव
लातूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यात लातूर शहर विधानसभा मतदार संघातील एकूण ३६ हजार महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून लवकरच त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती या योजनेच्या लातूर शहर विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा प्रेरणा होनराव यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची महत्वपूर्ण बैठक नुकतीच प्रेरणा होनराव यांच्या अध्यक्षतेखाली लातूर शहर मनपाच्या कार्यालयात मंगळवारी, दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी तथा सदस्य सचिव रोहिणी नऱ्हे – विरोळे, अशासकीय सदस्य नवनाथ आल्टे , सदाशिव गव्हाणे, सदस्य, तहसीलदार लातूर, मनपा उपायुक्त लातूर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, मनपाचे वडगावे , मनपा महिला व बालविकास अधिकारी प्रियंका तारू, बालविकास प्रकल्प अधिकारी भाग्यश्री क्षीरसागर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अध्यक्षा प्रेरणा होनराव यांनी मागच्या बैठकीत शहरातील ८५ हजार महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते, त्या व्यतिरिक्त काही त्रुटी आढळलेल्या अर्जाची छानणी करून ते मंजुरीसाठी पुन्हा समितीसमोर घेण्यात आले. त्यामध्ये ३६ हजार अर्जांना मंगळवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले. या महिलांच्या खात्यावर लवकरच या योजनेचे पैसे जमा होतील असे सांगून प्रेरणा होनराव म्हणाल्या की, या योजनेच्या माध्यमातून मागच्या वेळी मिळालेल्या पैशाने महिलांमध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. आता मंजूर करण्यात आलेल्या सर्वच महिलांच्या खात्यावर तीन महिन्याचे एकूण साडेचार हजार रुपये प्रत्येकी जमा होणार आहेत. प्रशासनाने अवघ्या २० दिवसात ३६ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी घेतलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. अध्यक्ष या नात्याने आपण उर्वरित महिला भगिनींनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी गतिमान यंत्रणा कार्यान्वित करून या योजनेपासून एकही महिला भगिनी वंचित राहणार नाही, याची दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्याचे होनराव यांनी सांगितले.