ड्रॅगन फ्रुट फळबाग लागवडीसाठी ४ लाखापर्यंत कर्ज
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सभासदांना शेतीपूरक व्यवसाया अंतर्गत स्वयं रोजगाराची संधी प्राप्त व्हावी व त्यांच्या जीवनात आर्थिक सक्षमता यावी या उद्देशाने ड्रॅगन फ्रूट फळबाग लावडीसाठी कर्ज वाटपाचा निर्णय घेण्यात आला असुन त्या निर्णयानुसार सभासदांना हेक्टरी ४ लाखापर्यंत कर्ज वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी दिली आहे यामुळें ग्रामीण भागातील जिल्ह्यातील शेतक-यांना बळ मिळणार आहे
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना राबवून शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत असून शेतक-यांकडील प्रस्तावित ड्रॅगन फ्रुट फळबाग लागवड क्षेत्रास अधीन राहून प्रती हेक्टर ४ लाख रुपयापर्यंत कर्ज मंजुर करण्यात येणार आहे. यासाठी ७ वर्षाचा कर्ज कालावधी राहणार आहे. अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा बँकेच्या नजीकच्या शाखेत संपर्क साधावा तसेच जास्तीत शेतकरी सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख, व्हॉईस चेअरमन अॅड. प्रमोद जाधव, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव व संचालक मंडळ यांनी केले आहे.