छत्रपती शिवाजी राजांचा पुतळाच नव्हे, महाराष्ट्राची अस्मिता कोसळली – उषा कांबळे
उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. या घटनेने उभा महाराष्ट्र दुःखी कष्टी झाला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली असली तरी, या प्रकरणातील दोषीवर कारवाई होणे अपेक्षित आहे. कारण मालवण येथे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच कोसळला असे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता कोसळली आहे. महाराष्ट्राला या गोष्टीचे प्रचंड दुःख आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे दैवत आहेत, मात्र या गोष्टीचे गांभीर्य सत्ताधाऱ्यांना नाही. महाराजांचे नाव केवळ राजकारणासाठी घेतले जात असल्याचे या घटनेवरून सरळ सरळ जाणवू लागले आहे. दोन कोटी चाळीस लाख रुपयांचा हा पुतळा आहे. आणि त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी दोन कोटी दोन लाख रुपये खर्च झाले आहेत. यावरूनच शासनाचे धोरण आणि कंत्राटदारांना पोसणे याला प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस सौ. उषा कांबळे यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने मालवण घटनेच्या निषेध मोर्चाच्या समारोप प्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्या बोलत होत्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. डॉ. शिवाजी मुळे, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते बाळासाहेब पाटोदे, सतीश पाटील मानकीकर, संदीप पाटील, दत्ता पाटील, अक्षय सोनकांबळे, कुंडलिक वाकोडे, व्यंकट कोकणे, गोविंद भोसले, संदीप पाटील कासरालकर ,अंकुश ताटपल्ले, आकाश माने, मल्लिकार्जुन करडखेलकर, संजय सुरवसे, गोविंद वागदरी, संतोष बिरादार, संजय शिंदे, अंकुश बामणे, मंजूर खा पठाण, अझरुद्दीन शेख, विजयकुमार पाटील, दत्ता सुरनर, मदन पाटील, आदित्य बिरादार, श्रीनिवास एकुरकेकर ,राम रावणगावे, शंकर मोरे, पद्माकर उगिले, कनिष्क शिंदे, राहुल बिरादार, विपिन जाधव, श्याम मोरे, राहुल बिरादार, दशरथ कोयले, व्यंकट सगर, बालाजी बिरादार, परमेश्वर अडगुलवार, प्रीतम गोखले, अमोल कांडगिरे, आदर्श पिंपरे, संजय सुरवशे, धीरज कसबे इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या घटनेचा जाहीर निषेध करून दोषी वृद्ध कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली.
पुढे बोलताना उषा कांबळे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य हे सध्या गुत्तेदारांच्या फायद्यासाठी चालवले जाणारे राज्य आहे की काय? अशी शंका येण्याइतपत निकृष्ट दर्जाची कामे होत असताना देखील सरकारी यंत्रणा त्याला पाठराखण करत आहे. असे अनेक ठिकाणी दिसून येत असून देखील कारवाई काहीच नाही. मालवण ची घटना ही अशा निकृष्ट कामाचीच पावती आहे. त्यामुळे संबंधिताच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यावर पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, केवळ मतावर डोळा ठेवून मोठमोठ्या योजना जाहीर करायच्या आणि पूर्वी चालू असलेल्या योजनाकडे दुर्लक्ष करायचे, असा कारभार चालू आहे. त्यामुळेच महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या घटनेला म्हणावे त्या गांभीर्याने सरकार पाहत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. आणि म्हणून या शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र आले आहेत, असे सांगितले.