महेश बॅंकेची विस्तार, विकास व विश्वासावर प्रगतीची घोडदौड – आमदार बाबासाहेब पाटील
महेश अर्बन को.ऑप .बँकेची ३१ वी वार्षीक सर्वसाधारण सभा
अहमदपूर (गोविंद काळे) : शेतकऱ्याच्या मुलांनी बँकेची सुरुवात केली आहे. सभासद व कर्मचारी यांच्यामुळे बँकेने विस्तार , विकास आणि विश्वास या त्रिसूत्रीवर प्रगतीची घोडदौड करीत पुण्यापर्यंत मजल मारली असून लवकरच मुंबईमध्ये शाखा काढणार असल्याचे प्रतिपादन बँकेचे जेष्ठ संचालक आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले .
महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.अहमदपूर ची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिजाऊ फंक्शन हॉल अहमदपूर येथे उत्साही वातावरणात संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे होते तर ज्येष्ठ संचालक आमदार बाबासाहेब पाटील ,बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, कृउबा सभापती मंचकराव पाटील, ह.भ.प. कृष्णा महाराज धानोरकर, अविनाशराव जाधव, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव काळे, माधवराव जाधव, माधव पवार ,शेषराव मुंजाणे, चव्हाण आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी बँकेची सुरुवात केली व आपल्याच भागातील शेतकऱ्यांची मुले,मुली कर्मचारी म्हणून घेण्याचे त्यांनी ठरवले होते.महेश बँकेने व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा केल्यामुळे शहराची प्रगती होत असल्याचे सांगितले.याबरोबरच अहमदपूर- चाकूर तालुक्यात हरितक्रांतीचे आपले स्वप्न असल्याचे सांगून महिलांना अर्थिक प्रगतीची संधी उपलब्ध करून देणे ही आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले. या मतदारसंघातील दूध डेअरी आणि महिलांच्या बचत गटाला बँकेने आर्थिक मदत केलेली आहे. विकासाबरोबरच अध्यात्म्याची प्रगती करणे ही गरजेचे असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की या शहरांमध्ये एक मोठे वस्तीग्रह आणि करमणुकीसाठी नाट्यगृह उभारण्याची इच्छा असल्याचे सांगितले.या बँकेला तीन कोटी नऊ लाख रुपये नफा झाला असून लवकरच मोबाईल बँकिंग सुविधा सभासदांना उपलब्ध करून देणार आहोत. आज पर्यंत कर्मचाऱ्यांनी गोडीने आणि प्रेमाने सभासदांना सेवा दिली आहे.ही कौटुंबिक बँक असल्याचे शेवटी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करते वेळी सिद्राम रंदाळे म्हणाले की १९९४ ला बँकेची स्थापना केली असून बँकेचे १५६६५ सभासद झाले आहेत.आज बँकेच्या पंधरा शाखा चालू असल्याचे सांगून बँकेत १२५ कर्मचारी कार्यरत आहेत तर २५ ते ३० पिग्मी एजंट असल्याचे सांगितले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे अहवाल वाचन करतेवेळी म्हणाले की बँक एनपीए चे प्रमाण ०% राखण्यामध्ये यशस्वी झालेली आहे. तसेच बँकेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ठेवी रू.४०३ कोटी ४४ लाख, एकूण कर्ज रू.२४३ कोटी ७९ लाख असून एकूण रू.६४७ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केलेला आहे.बँकेची गुंतवणूक रू.१७० कोटी ६५ लाख इतकी असल्याचे सांगितले.
यावेळी ह भ प कृष्णा महाराज धानोरकर म्हणाले की पैशापेक्षा अनुभवाने माणूस हुशार होतो. महेश बँकेच्या या छोट्या रोपट्याचे आता मोठ्या वृक्षात रूपांतर झाले असून माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे हिरा असल्याचे अनेक उदाहरणासह पटवून दिले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष माजीमंत्री बाळासाहेब जाधव, कृष्णा महाराज धानोरकर, उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जेष्ठ संचालक आमदार बाबासाहेब पाटील
, कृउबास सभापती मंचकराव पाटील, सिद्धी शुगर चे मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश जाधव, संचालक शिवानंद हेंगणे , संचालक दिलीप जाधव, ॲड.विनायक भोसले, सतिश कल्याणे, आशोक गादेवार, आशीष गुणांचे ,नौनिहालसिंह जहागीरदार, सुदर्शन मुंडे , पुरुषोत्तम पुरोहित, संगीता खंडागळे, सत्यकला जाधव, ॲड.भारतभूषण क्षिरसागर, धनंजय दारफळकर (सी.ए.), व्यवस्थापकीय मंडळ देवेंद्र जाधव , प्र.व्यवस्थापक प्रशांत मांडवकर, मॅनेजर अविनाश देशमुख यांच्यासह पदाधिकारी, सर्व शाखेचे मॅनेजर, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. व्यवस्थापक सिद्राम रंदाळे,सुत्रसंचलन प्रा. मारोती ब्रुद्रूक व संभाजी चोपणे यांनी तर आभार शिवानंद हेंगणे यांनी मानले.