बैल पोळ्याचा बाजार सजला पण अति वृष्टीच्या भीतीमुळे शेतकरी बाजारात फिरकेनात!
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील मेन रोडचा परिसर , आझाद चौक, शिवाजी चौक, थोडगा रोड बैल पोळा सणाच्या निमित्ताने बैलांना सजविण्याच्या विविध रंगबिरंगी वस्तूंनी बाजार फुलला आहे. पण सतत पडत असलेल्या पावसामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी या बाजाराकडे फिरकेनासा झाला आहे. कारण दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या बैल पोळ्याच्या सणाच्या अगोदरच शुक्रवारी रात्रभर व शनिवारी दिवसभर सतत संतत धार पावसामुळे शेतकरी घराबाहेर तर पडलाच नाही पण ऑगष्ठ महीना संपत आला तरी पाऊस काही थांबायचे नाव घेत नसल्यामुळे ओल्या दुष्काळाच्या भीतीमुळे साहजिकच आठवडी बाजारावर आणि पर्यायाने बैलपोळा सणावर मंदीचे सावट पसरले आहे.
यंदाच्या वर्षी सोमवारी दि २ सप्टेंबर बैल पोळा साजरा केला जाणार आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी विविध प्रकारे सजविले जाते. गळ्यात चंगाळे (घंटा) बांधल्या जातात. सुती धाग्यात विणलेल्या चंगाळ्यांवर लोकरी गोंडे गुंफलेले असतात. बाजारातील बहुतांश घंटा या पितळेच्या आहेत. त्यामुळे एका जोड चंगाळ्याची किंमत ४०० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत आहे. तर चामड्याच्या तयार केलेल्या चंगाळ्याची किंमत कमीत कमी ५०० रुपयां पासून ते १ हजारा पर्यंत आहे.
दोरीत रंगीत धागे विणून बनवलेले गोंडे बाजारात आले आहेत. त्याची किंमत ४० रुपयांपासून ११० रुपयांपर्यंत आहे. बैलांच्या गळ्यातील कवड्याच्या माळा ११० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. शिंगांना लावण्यासाठी विविधरंगी रंग बाजारात आले आहेत. बैलांना सजविण्याची ही सर्व आभूषणे शेतकरी दरवर्षीच्या पोळ्याला नव्याने घेतो. पण यंदा सतत पडणाऱ्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळी परिस्थितीच्या भितीमुळे व बाजारातील मंदीमुळे बळीराजाच्या हातात पैसा तर खेळतच नाही पण दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या बैल पोळ्याच्या सणाच्या अगोदरच शुक्रवारी रात्रभर व शनिवारी दिवसभर सतत संतत धार पावसामुळे शेतकरी घराबाहेर तर पडलाच नाही पण ऑगष्ठ महीना संपत आला तरी पाऊस काही थांबायचे नाव घेत नसल्यामुळे ओल्या दुष्काळाच्या भीतीमुळे साहजिकच आठवडी बाजारावर आणि पर्यायाने बैलपोळा सणावर मंदीचे सावट पसरले आहे.त्यामुळे आपल्या लाडक्या सर्जा-राजाला पोळ्याच्या दिवशी जुन्याच आभूषणांनी त्याला सजवावे लागणार आहे.
शेतकऱ्यांकडे बैलच उरले नाहीत…
दरवर्षीच्या जनावरांच्या चारा, पाण्याच्या प्रश्नाला कंटाळून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी अनेक शेतकऱ्यांकडे चार ते पाच बैलजोड्या असायच्या. आज त्यांच्या गोठ्यात एकही बैल पाहायला मिळत नाही. काही ठराविकच शेतकऱ्यांकडे एखाददुसरी बैलजोडी दिसून येत आहे. त्यामुळे पोळ्याला त्यांच्या लाडक्या बैलांसाठी वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण घटले आहे.
- विनोद पंचारे व्यापारी अहमदपूर ता अहमदपूर
लाडक्या बैलांसाठी काही तरी करावे लागणार…
बैल पोळा सणावर दरवर्षी कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ तसेच शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झाला तर आहेच पण पोळ्याच्या सणासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर देखील वाढले आहेत. दर जरी वाढले असले तरी, लाडक्या सर्जा-राजासाठी कर्जाने का होईना, साहित्य खरेदी करावेच लागणार आहे.
- शिवाजी काळे शेतकरी सुनेगाव ( शेंद्री) ता अहमदपूर