व्हि .एस. पँथर्सचे विनोद खटके यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
वंचित बहुजन आघाडीने संविधान बचाव यात्रा काढली नसती तर मराठवाडा पेटला असता : अॅड. प्रकाश आंबेडकर
लातूर (दयानंद स्वामी) : राज्यात वंचित बहुजन आघाडीने संविधान बचाव यात्रा काढली नसती तर अवघा मराठवाडा पेटला असता. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार आहे. त्यामुळे मतदारांनी जात पाहून निर्णय न घेता सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने वंचितच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
लातूर येथील व्हि .एस. पँथर्सचे संस्थापक विनोद खटके यांच्या वंचित बहुजन आघाडीतील जाहीर प्रवेशाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या महामेळाव्यात ते बोलत होते. हा महामेळावा दयानंद सभागृहात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. विनोद खटके यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह अविनाश भोसीकर,प्रवीण रणबादल , संतोष सूर्यवंशी, सलीमभाई , सावंत, रमेश गायकवाड, सय्यद, मंजुषा निंबाळकर, लामतुरे मॅडम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात आज सगळा अनागोंदी कारभार चालला आहे. सामाजिक शांतता राहिली नाही, महिला भगिनी सुरक्षित नाहीत. लैंगिक अत्याचार वाढले आहेत. आरक्षणाच्या कारणावरून सरकार दिशाभूल करत असल्याचा घणाघाती आरोप करून अॅड. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एक तत्वनिष्ठ नेते होते. तत्वासाठी त्यांनी कधीही पदाला महत्व दिले नाही. आज त्यांच्यासारख्या तत्वनिष्ठ नेत्याची राज्याला , देशाला आवश्यकता आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबाही देत नाहीत, विरोधही करत नाहीत. याचाच अर्थ ते योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे मतदारांनी आगामी निवडणुकीत अशा निर्णय क्षमता नसलेल्या पक्ष आणि नेत्यांना थारा देऊ नये, असे मत व्यक्त करून शरद पवार हे थोर नेते आहेत, ते दाऊदचेही मित्र असल्याचे उपहासाने नमूद केले.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणीही या आणि टिकली मारून जा, अशा वृत्तीच्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यावी. पैसे – दारूचे प्रलोभन दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणारे काही महिने वादळी असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला यातून राज्य शासनाचा कारभार किती भ्रष्ट आहे ही बाब समोर आली. त्यामुळे सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आजच्या राजकारणाचा आधारस्तंभ हा विकास नाहीतर दंगल घडविणे, विभाजन घडविणे हेझल आहे, हे राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. महिला – मुलींच्यावर लैंगिक अत्याचार होत आहेत. महिलांच्या शरीराची विटंबना होत आहे. बलात्काऱ्यांना फासावर लटकावून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी कठोर निर्णयक्षमता असणारे सरकार हवे आहे. आजच्या परिस्थितीवर सरकारचे नियंत्रण नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
वंचितमध्ये प्रवेश केलेल्या विनोद खटके यांनी आपल्या मनोगतात व्हि. एस. पँथर्सच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन यापुढे वंचितच अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे काम करण्यास आपण व आपले सहकारी तयार असल्याचे सांगितले. यावेळी सय्यद, मंजुषा निंबाळकर, रमेश गायकवाड, संतोष सूर्यवंशी, अशोक पाटील, अविनाश भोसीकर यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष मांदळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रतीक कांबळे यांनी केले. यावेळी अमोल सुरवसे, आनंद जाधव, किरण पांचाळ, शरद किणीकर, असदभाई शेख, रवी कांबळे, अतुल होळकर,. नितीन पडसाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.