अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर,नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे
अहमदपूर मतदारसंघातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्याची निवेदनाद्वारे मागणी.
पिक विमा द्यावे, कर्ज माफ करण्याची मागणी
अहमदपूर (गोविंद काळे) : या मतदारसंघात गेल्या सात- आठ दिवसांपासून ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना हे आर्थिक नुकसान सहन होणारे नाही. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरकट हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देऊन, खरीप व रब्बी हंगामाचा पिक विमा देण्यात यावा. सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ,भारतीय काँग्रेस पक्ष व शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्यामार्फत शासनाला देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
अहमदपूर- चाकूर या मतदारसंघांमध्ये ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेल्या कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या नदीकाठच्या जमिनी अति पावसामुळे खरडून गेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये सद्या पाणी साचलेले आहे. यामुळे उत्पन्नामध्ये फार मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.या मतदारसंघातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकाचा पिक विमा देणे गरजेचे असतानाही देण्यात आले नसून तो त्वरित देण्यात यावा असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
अहमदपूर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.पूर परिस्थितीमुळे सोयाबीन,मूग ,उडीद ,कापूस ,ज्वारी,तूर इत्यादी पिके हातून गेले आहेत. तरी अहमदपूर- चाकूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देऊन सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. पुरामुळे शेतकऱ्यांचे अवजारे, गाई, म्हशी ,बैल वाहून गेले असल्यामुळे यांनाही नुकसान भरपाई देण्यात यावी. या सततच्या अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे पडलेली आहेत. या सर्व लोकांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री विनायकराव पाटील , शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, भारतीय काँग्रेसचे सांब महाजन ,तालुका अध्यक्ष डॉ. गणेश कदम ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राम बेल्लाळे ,शिवसेनेचे विलास पवार , ॲड.आर.डी.शेळके ,परमेश्वर घोगरे ,सुधीर गोरटे, सय्यद साजिद, जरान पठाण , प्रवीण खोमणे ,शिवानंद भोसले, विजयकुमार पाटील, संतोष रोडगे ,निळकंठ पाटील ,राजीव खंदाडे, केदार काडवादे, विकास महाजन ,रणधीर पाटील, अमोल पाटील सुभाष गुंडीले, संदीप चौधरी, गणेश माने ,शिवानंद कासले, इंदुताई पाटील आदींसह तिन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.