आचार, विचार आणि उच्चारातून शिक्षकांनी राष्ट्रीय चारित्र्य घडवावे – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षक ही ईश्वरीय देणगी असून त्यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कार्य करावे. शिक्षक हा ज्ञानसत्तेचा पाईक असतो आणि ज्ञान साधनेत सातत्य ठेवून आचार, विचार आणि उच्चारातून शिक्षकांनी आपले व राष्ट्राचे राष्ट्रीय चरित्र घडून नव राष्ट्र निर्मितीचे कार्य करावे, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक , लेखक तथा प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील यांनी केले .
याबाबतचे सविस्तर होत असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या आय. क्यू. ए.सी. विभागांतर्गत माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘शिक्षक दिन ‘ कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी किसान पीठावर किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे उपाध्यक्ष माधवराव पाटील, उपप्राचार्य डॉ. डी.डी.चौधरी तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. सतीश ससाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते वृध्दींगत करण्याचे करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर केले जाते. आपल्या संस्कृतीत सर्व कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते परंतु आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणेश पूजन अगोदर गुरुपूजन करून गुरू प्रति निष्ठा व्यक्त केली व त्यांचा सन्मान केला. गुरु हे ज्ञान सत्तेचे पाईक असतात त्यांनी ज्ञानसाधनेत विद्यार्थ्यांना सामावून घेऊन एक आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य करावे तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी स्वतःला अद्यावत बनवून विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत उतरण्याचे बळ निर्माण करून द्यावे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वतीने प्राचार्य व सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच महाविद्यालयाच्या वतीने डॉ. संतोष पाटील, डॉ. सीमा उप्पलवाढ, प्रा.किरण मोरे,प्रा. प्रतीक्षा मंडोळे, प्रा.के. आर. कदम, प्रा.प्रकाश गायकवाड, प्रो. डॉ. अनिल मुंढे, प्रो.डॉ. अभिजीत मोरे, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ.किरण गुट्टे, डॉ. सचिन गर्जे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. बी.के. मोरे, डॉ. सतीश ससाणे, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे आदींना गुणवंत प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मराठी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘ आविष्कार ‘ या भितीपत्रकाचे तसेच विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या जीवन कार्यावर तयार करण्यात केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दिव्या गुळवे, शिवकन्या पुट्टेवाड, ऋतुजा सोनवणे, आरती मंडले या विद्यार्थिनींनी व प्राध्यापकांच्या वतीने प्रा. के. आर. कदम, डॉ. सतीश ससाणे यांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच या कार्यक्रमाप्रसंगी विश्व कम्प्युटर अहमदपूरच्या वतीने गणेश दुबळे,टाटा समुहाच्या तनिष्क ज्वेलरीच्या वतीने बडे व गिरी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन्मान केला. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवकन्या सुरनर , आरती मंडले, वैष्णवी मंडले, ऋतुजा देशमुख, पायल मंडले यांनी प्रार्थना गीत गाऊन श्रोत्यांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋतुजा देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन आरती मंडले, शिवकन्या सुरनर व डॉ. मारोती कसाब यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.