शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय दुग्ध दिवस उत्साहात साजरा
उदगीर (प्रतिनिधी) : शिवाजी महाविद्यालयात दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय दुग्ध दिवस भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक डॉ.वर्गीस कुरियन यांना सन्मानित करण्यासाठी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एम.मांजरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एस.डी. कल्याणकर सहयोगी प्राध्यापक दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय उदगीर, डॉ.एस.एन. लांडगे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर,आयक्वेशी सेलचे समन्वयक डॉ.व्ही.एम.पवार, दुग्धशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.रंजन येडतकर यांची होती. सर्वप्रथम भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक डॉ.वर्गीस कुरियन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.एस.डी. कल्याणकर ‘दुग्धशास्त्र व टीकाऊ शेती’ या विषयावर व्याख्यान देत असताना म्हणाले,दुग्ध उत्पादन क्षेत्रातील संधी खूप आहेत.भारतामध्ये दुग्ध उद्योग क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. तर डॉ.एस.एन.लांडगे म्हणाले डॉ.कुरियन यांनी दुग्ध उत्पादकांच्या स्वावलंबनासाठी सहकारी चळवळीला बळकटी दिली आणि देशभर दुग्ध प्रक्रिया व वितरण व्यवस्थेमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणले.त्यांच्या या कार्यामुळे दुग्ध उद्योग हा केवळ व्यवसाय न राहता ग्रामीण भारताच्या विकासाचा पाया ठरला.आयक्वेशी सेलचे समन्वयक डॉ.पवार यांनी कुरियन यांच्या ‘ I Too Had a Dream ‘ या ग्रंथाविषयी थोडक्यात माहिती दिली. हा ग्रंथ त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा वाढता आलेख सांगणारा आहे असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्षातील विद्यार्थीनी अक्षरा कांबळे यांनी प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा.रंजन येडतकर यांनी तर आभार प्रदर्शन शिवलीला पाटील यांनी मानले.या कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयाचे के.व्ही.जाधव, प्रयोगशाळा सहाय्यक एस.एम.मुंडे, आर.डी.दर्वेशवार व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.