28 नोव्हेंबर रोजी उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाचा 19 वा वर्धापन दिन
उदगीर (प्रतिनिधी) : अंधत्व निवारणाचा महायज्ञ पूर्ण मराठवाडा आणि सीमावर्ती भागात अविरतपणे चालू करून, लाखो नेत्र रुग्णांना, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 18 वर्ष फार मोठे कार्य झाले आहे. या कार्याची जाणीव ठेवत 19 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अंधत्व निवारणासाठी गावोगावी नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करणाऱ्या संयोजकांचा सत्कारही 28 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजता, लॉ. अशोक भाई मेहता उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी लातूर येथील आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉक्टर सौ. अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक लातूर डॉक्टर प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बी एम शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी लातूर संतोषजी नाईकवाडी हे मान्यवर उपस्थित राहणार असून उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाच्या एकूण कामकाजावर प्रेम करणाऱ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे. असे आवाहन लायन्स परिवार आणि उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या वतीने करण्यात आले आहे. उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाच्या वतीने आज पर्यंत एक लाख 80 हजार शस्त्रक्रिया करून नेत्र रुग्णाला दृष्टी देण्याचे कार्य केले आहे. या कामासाठी 4700 शिबिर घेण्यात आले आहेत. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील 12 लाख नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे अशा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नेत्र रुग्णालयास प्रेरणा देण्यासाठी सुजाण नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असेही संयोजकांच्या वतीने कळवले आहे.