राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत अक्षरमुद्रा अंकाला सन्मान
उदगीर (एल.पी.उगीले) : मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत उदगीर येथील “अक्षरमुद्रा” या अंकाला प्रतिष्ठेचा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार जाहीर करण्यात आला. या स्पर्धेसाठी १७३ दिवाळी अंकांनी सहभाग घेतला होता. दिवाळी अंक स्पर्धेचे हे ४७ वे वर्ष आहे. संपादक दीपक चिद्दरवार यांच्या मार्गदर्शना खाली प्रकाशित झालेल्या “अक्षरमुद्रा” या दिवाळी अंकातील लेखांना परीक्षकांकडून विशेष प्रशंसा मिळाली. या दिवाळी अंकाचे तिसरे वर्ष होते. दिवाळी अंकाच्या निर्मितीसाठी साहित्य क्षेत्रातील नामवंत लेखकांनी आपले लेखन केले. या दिवाळी अंकाच्या यशस्वीतेसाठी प्रा. दत्ता भगत, दिलीप फलटणकर, रवीप्रकाश कुलकर्णी, दिलीप देशपांडे, धनंजय गुडसूरकर यांसारख्या लेखकांनी मार्गदर्शन केले आहे. स्पर्धेतील विजेत्या अंकांला सन्मानपत्र प्रदान सोहळा दादर सार्वजनिक वाचनालय येथे गुरुवार, २७ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता पार पडणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध कवी आणि भाषाशास्त्रज्ञ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा आणि साहित्य संवर्धनाच्या दृष्टीने अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असून, “अक्षरमुद्रा”च्या यशामुळे उदगीरच्या साहित्य क्षेत्रात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. तिसऱ्याच वर्षी उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे या दिवाळी अंकाला सर्वत्र प्रसिद्ध मिळाली आहे.
