सोयाबीन वर गोगलगाईचा हल्ला, कोवळी पिक कुरतडायला सुरू

सोयाबीन वर गोगलगाईचा हल्ला, कोवळी पिक कुरतडायला सुरू

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर ग्रामीण भाग आणि सीमावर्ती भागातील अनेक ठिकाणी सोयाबीन पिकावर गोगलगाय या त्या छोट्याशा पण पिकाला अत्यंत हानिकारक असणाऱ्या घटकामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कोवळ्या पिकाची पाने कुरतडून गोगलगाय पिकाचे नुकसान करत आहेत. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. नगदी पीक म्हणून सोयाबीन कडेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा ओढा आहे.पिक चांगल्या बहरात येत असतानाच अनेक ठिकाणी गोगलगायचा प्रादुर्भाव होत असून अनेक शेतकऱ्यांनी चक्क पिकावर नांगर फिरवून दुसऱ्यांदा पेरणी करण्याचा निर्णय केला आहे. यासंदर्भात कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

 ज्या ठिकाणी मोठा प्रादुर्भाव झालेला आहे, त्या ठिकाणी गोगलगाईच्या नियंत्रणासाठी दोन किलो ज्वारीचा भरडा घेऊन त्यात 50 एम एल रीजेंट कीटकनाशक लावून शेतात जागोजागी भरडा टाकावा, किंवा वाळलेल्या गवताचे जागोजागी ढिगारे ठेवून त्याखाली जमा झालेल्या गोगलगाय नष्ट कराव्यात किंवा गुळाचे पाणी करून त्यात गोनपाट भिजून ते जागोजागी ठेवावेत व त्याखाली जमा झालेल्या गोगलगाय नष्ट कराव्यात. असे आवाहन अनुभवी शेतकऱ्यांनी केले आहे. कृषी खात्याकडून अधिकृतरित्या यासंदर्भात अद्याप तरी सूचना आल्या नसल्याची माहिती सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांनी दिली आहे.

About The Author