किसान मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मोठे साधन – दीलीपराव देशमुख
लातूर (एल.पी.उगीले) : भारतीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न सोडवता येऊ शकतात. देशभरातील एक प्रभावी संघटन म्हणुन भारतीय जनता पक्षाने किसान मोर्चाची स्वतंत्र सेलची स्थापना केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचे आणि महत्त्वाचे असतात. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख यांनी दिले.
ते अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथे जाहीर सत्काराला उत्तर देताना बोलत होते. अहमदपूर विधानसभा मतदार संघात दीलीपराव देशमुख यांना मानणारा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने तळेगाव येथे दीलीपरा देशमुख यांची किसान मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार समारंभासाठी ऍड. सुधाकरराव जगताप, अजमल शेख, विकास घणाचारे, बाळासाहेब शेळके, चेअरमन विश्वंभर पवार, प्रशांत कानवटे, दौलतराव कानवटे, भीमसेन जाधव, तानाजी घोरपडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना दिलीपराव देशमुख म्हणाले की, सर्व सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस बनवले आहे. निश्चितच ही फार मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी मी सर्व ताकतीने पेलुन दाखविन. अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती असतांना शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर, कष्टकरी, हमाल, मापाडी, व्यापारी यांचे प्रश्न अत्यंत जवळून पाहिलेले असल्यामुळे आणि त्यांना न्याय देण्याची हातोटी असल्यामुळे, निश्चितच महाराष्ट्रभर किसान मोर्चा च्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करणारा आहे. भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी ज्या विश्वासाने प्रदेश सरचिटणीस बनवले आहे. त्या विश्वासाला पात्र राहून काम करून दाखवेन. माझ्या भागातील जनतेला माझ्या कामाचा अभिमान वाटेल असेच उज्ज्वल कार्य माझ्या हातून होईल. माझ्या नेत्यांना किंवा माझ्या जनतेला खाली मान घालावी लागेल असे कोणतेही कार्य माझ्या हातून कदापि होणार नाही. असेही याप्रसंगी दीलीपराव देशमुख यांनी जाहीर केले. या सत्कार समारंभासाठी तळेगाव परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.