महिलांचे आणि विद्यार्थिनींचे प्रश्न सोडवणार – तृप्ती पंडित
उदगीर (प्रतिनिधी) : समाजामध्ये महिला आणि विद्यार्थिनी कित्येक वेळा अन्याय सहन करत असतात. त्यामुळे अन्याय करणाऱ्यांची हिंमत वाढते. हे थांबले पाहिजे. महिला आणि विद्यार्थिनींना कोणीतरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आपण काम करणार आहोत. असे उद्गार श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तृप्ती पंडित यांनी काढले.
त्या शाळेतील जेष्ठ शिक्षक, कर्मचारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात बोलत होत्या. नुकतीच श्रीमती तृप्ती पंडित यांची महिला दक्षता समितीवर निवड झाली आहे. विद्यार्थिनींचे विविध प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी महिला दक्षता समिती एक प्रभावी साधन आहे. असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक पर्यवेक्षक नाना चोपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल घुमाडे यांनी केले.