अंगणवाडी सेविकांना खूशखबर! मिळणार 1 कोटी 92 लाख रुपयांचा प्रोत्साहन भत्ता
लातूर (एल.पी.उगीले)
राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना एक कोटी 92 लाख रुपयांचा निधी दिला आहे. हा भत्ता येत्या काही दिवसांत अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महायुती सरकारने निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनिसां मार्फत करण्यात आले. अर्ज भरण्या साठी या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम केले. प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता संबंधित कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचना होत्या. यानुसार अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या सदस्या, आशा वर्कर यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाईल असे जाहीर करण्यात आले होते.
ज्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले त्यांनी अजूनही प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. हा निधी लवकरात लवकर जमा करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे.
