मतभेद असू द्या, मनभेद नका – आ. कराड

मतभेद असू द्या, मनभेद नका - आ. कराड

 उदगीर (प्रतिनिधी) : पक्ष मोठा झाला की, वेगवेगळे विचार असलेली माणसे पक्षाशी जोडले जातात. प्रत्येकाचे वैचारिक मतभेद असू शकतात मात्र आपण एका पक्षात काम करत असल्यामुळे एकाच ध्येयाने पुढे जायचे ठरवल्यास येणाऱ्या सर्व निवडणुकात भारतीय जनता पक्ष सर्वात प्रभावी राहील.असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश आप्पा कराड यांनी व्यक्त केला. उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित तालुका मेळाव्यात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

 याप्रसंगी माजी आमदार गोविंद केंद्रे, सुधाकर भालेराव, भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दीलीप्राव देशमुख, संजय दोरवे, मधुकर क्षीरसागर, बसवराज बारबंदे, जि प सदस्य उषाताई रोडगे, महिला आघाडीच्या उत्तरा कलबुर्गे, अरुणा चिमेगावे, सरोज वारकरी, बालाजी गवारे, पंडित सूर्यवंशी, अमोल निडवदे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या अंतर्गत बंडाळी आणि एक-दुसर्‍याचा विरोध यामुळे भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागल्याची खंत अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. याप्रसंगी शिवाजीराव भोळे, सुधाकर बिरादार, साईनाथ चीमेगावे, शिवशंकर पांडे, सावन पस्तापुरे या मान्यवरांनी आपले विचार मांडले.

 याप्रसंगी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन आमदार रमेशअप्पा कराड यांनी स्पष्ट केले की, मागील काळात झाले गेले विसरून सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम केल्यास पक्षाला शक्‍ती मिळणार आहे. महाराष्ट्रातील सरकार येणाऱ्या काही दिवसात गडगडेल अशी भविष्यवाणी हि कराड यांनी केली. महाराष्ट्रातील सरकार सर्वच आखाड्यावर अपयशी ठरले आहे. वीज, पाणी, रस्ते, कोरोना या सर्व प्रश्नाला सरकार बगल देत आहे. शेतकऱ्यांना कुठलीच मदत दिली नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी जनमानसापर्यंत हा विचार पोहोचवला पाहिजे. स्वतःला जाणता राजा म्हणून घेणारा भ्रष्टाचाराचा महामेरू ठरला आहे. हे सरकार सर्वसामान्यांना देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाही. या सर्व गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन कार्यकर्त्यांनी बुथ पातळीवर मजबूत कार्य करून पक्ष संघटनेला शक्ती मिळवून द्यावी. उदगीर विधानसभा मतदार संघातील जर गटबाजी संपली तर भारतीय जनता पक्षाला रोखू शकण्याची क्षमता  कोणामध्येही नाही. त्यामुळे जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ चिमेगावे यांनी केले. आभार बसवराज रोडगे यांनी मानले.

About The Author