ग्रामीण भागात निवडणुकीचे वातावरण तापले
औसा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची सुरू झाली धामधूम
औसा (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतीच्या निवडणूकाची धामधूम सुरू आहे. सध्या औसा तालुक्यातील ग्रामीण भागात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी, गल्लीबोळात, चौकाचौकात, घरोघरी निवडणुकीच्या गप्पा ऐकायला मिळत आहेत. एकमेकांना पाडापाडीचा राजकीय डाव आखण्यात येत आहे. सध्या ग्रामीण भागात वाढत्या थंडी बरोबर राजकिय वातावरण तापलेले दिसून येत आहे. यामुळे निवडणूक प्रचार व मतदान होईपर्यंत उमेदवार व पॅनल प्रमुखांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
उमेदवार घरोघरी जाऊन मतदान मागत आहेत. गावचा विकास होण्यासाठी आम्हाला मतदान करा, आम्ही गावचा विकास करू, तुमची कोणतीही कामे असू द्या, आम्हाला सांगा ती करू अशी पोकळ आश्वासन देत आहेत. तसेच चाणाक्ष मतदारही आम्ही तुम्हालाच मतदान करू आणि विजयी करू अशी खात्री देत आहेत. तसेच प्रत्येक घरात सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत. अनेक उमेदवारांनी मतदारयाद्या ही चाळण्यास सुरुवात केली आहे. गावाबाहेर किती मतदार आहेत, त्यांना गावाकडे कसे आणायचे याबाबतची उपाययोजना आखण्यात येत आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा आपण किती सरस आहोत हे मतदारांना सांगत आहेत. सध्या हॉटेल, पानटपऱ्या, किराणा दुकान, धाब्यावर चांगलीच गर्दी दिसून येत आहे. तसेच चौकाचौकात भेटी घेत उमेदवार आपला प्रचार करत आहेत.उमेदवारांचे समर्थक मात्र उमेदवारांना तुम्हीच निवडून येता असे सांगून उमेदवाराला खुश करत आहेत. किती उमेदवार अर्ज माघे घेतात आणि किती जण रिंगणात हे सर्व पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काहीजण राजकीय पाठबळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला अर्ज माघे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सध्या शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी पूर्ण केली असून रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देत आहेत. दिवसा मात्र गावात चालणाऱ्या गप्पामध्ये सहभागी होत आहेत. आमचाच पॅनल निवडून येतो असे प्रत्येक पॅनलप्रमुख उमेदवार व त्यांचे समर्थक सांगत आहेत. अनेक गावांत दुरंगी व तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी हरबरा, गहू ,ज्वारी पिकाला पाणी देणे, तुरीची काढणी करणे, आदी कामे करत आहेत. बोटांवर मोजण्या इतक्याच गावात बिनविरोध निवडणूका होत आहेत. काही जण कामे सोडून उमेदवारांच्या माघे प्रचारासाठी धावून येत आहेत.या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला मात्र चांगलाच भाव आलेला आहे.