सुनेगाव (शेंद्री) शेनी ग्रामपंचायत कार्यालयाने सुरू केली गाव स्वच्छतेची मोहीम
अहमदपूर (गोविंद काळे) : पावसाळा आणि आरोग्य बिघाड हे जणू एका नाण्याच्या दोन बाजूच याच दृष्टीने ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा असणारा अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे आरोग्य.पावसाळा सुरू झालेला असून गावात जागोजागी साचलेली घाण, केरकचरा, माती, चिखल, दगड, तुंबलेल्या नाल्या, गटारे ई. सर्व ठिकाणची ग्रामपंचायत च्या वतीने दोन दिवसांपासून साफसफाई चालू आहे. गेल्या दोन दिवसांपासून गावातील सर्व मुख्य रस्ते, छोट्या, मोठ्या रस्त्यावर घरासमोरील रस्त्यावर असलेली घाण, कचरा सर्व गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत काढून टाकला.पावसाळ्यात तुंबलेली गटारे ही जणू रोगांना आमंत्रण देणारी ठरत असतात. गावात प्रत्येक घरासमोरील येणारे सांडपाणी योग्य रीतीने नियोजन बद्ध पध्दतीने सोडण्यावर ग्रामपंचायतचा भर देणार आहे. रस्त्यावर झालेली घाण ही आरोग्यासाठी अत्यंत घातक असून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी गावातील अनेक ग्रामस्थांनी पुढाकार घेत सगळे गटार साफ केले. राम जायभाये आणि गोपीनाथ जायभाये यांनी आपल्या स्वतः चे ट्रॅक्टर आणि जेसीबी गावात आणून सर्व ठिकाणची घाण साफ करून घेतली.
शाळा गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने शाळेत सुद्धा प्रचंड घाणीचे साम्राज्य साचले होते. त्या ठिकाणी सुद्धा स्वच्छता राबविण्यात आली आणि सर्व प्रकारची स्वच्छता करून घेण्यात आली. मुख्यत्वे गावात येणारा जुना नदी कडील रस्ता चिखलाने बरबटलेल्या अवस्थेत होता. या रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले होते. राम जायभाये आणि गोपीनाथ जायभाये यांनी स्वतः ची जेसीबी आणि ट्रॅक्टर घेऊन या रस्त्यावर मुरूम टाकून घेतला. हा रस्ता आता बऱ्यापैकी दुरुस्त झालेला आहे. ग्रामपंचायत शेजारी पाण्याची व्यवस्था असल्याने आणि सर्व शेजारी असलेल्या घरातील सांडपाणी येत असल्याने ग्रामपंचायत समोर पाणी साचून घाण साचली होती. ही सर्व घाण आणि नाली सफाई करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला . गावातील प्रत्येक नागरिकांनी स्वतः च्या हातात फावडे घेऊन घाण अगदी नाहीशी करून टाकली. ग्रामपंचायतच्या पाठीमागे असलेल्या घरांना गेल्या चार वर्षांपासून पाण्याचा पुरवठा उच्चदाबाने पोचला नव्हता. एकाच गावात राहणाऱ्या नागरिकांवर अशी वेळ येणे हे काही योग्य नसल्या कारणाने राम जायभाये यांनी आपल्या स्वतः च्या पैशांनी पाईप, वॉल आणून त्या ठिकाणच्या सर्व नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले. पावसाळ्यात होत असलेली घाण आणि आरोग्य बिघाड या दृष्टीने ग्रामपंचायत सुनेगाव शेनी शेंद्री यांनी अतिशय मोलाचे काम केले आहे. ग्रामस्थांनी याचा विचार करत प्रत्येक घर, प्रत्येकाच्या घरासमोरील रस्ता, अंगण, नाल्या इ. सर्व स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कोरोना सारखी महाभयंकर महामारी असताना नाल्या, गटार तुंबून मलेरिया, डेंगू, टायफाईड सारखे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ने केलेल्या स्वछता मोहिमेला हातभार लावणे आवश्यक आहे. सर्व ग्रामस्थांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला त्या बद्दल त्यांचे ग्रामपंचायतच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. आपण आपला परिसर स्वच्छ ठेवा. स्वतः च्या, कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या असे आव्हान ग्रामपंचायत सुनेगाव शेनी, शेंद्री तर्फे करण्यात येत आहे.