दुर्मिळ उदमांजराला पकडण्यात प्राणीमित्रांना यश
उदमांजराला सुखरूप सोडले निसर्गाच्या सानिध्यात
औसा (प्रतिनिधी) : दि 22 जुलै गुरुवार रोजी दुपारी एक ते दिड च्या दरम्यान याकतपुर (औसा) गावात राहुल अंगद मोरे यांच्या घराच्या शौचालयात एक उदमांजर आणि त्यांची पिल्लं असल्याचं आढळून आले.
मागील आठ-दिवसापासुन शेतशिवार आणि जंगलात क्वचित प्रमाणावर दृष्टीस पडणारा चंचल प्राणी उदमांजर Civit Cat (मरलांगी, बिज्जू) याकतपुर गावात हजेरी लावत होता. या प्राण्याचा वावर गावाच्या पश्चिमेस या परिसरात असल्याची प्रत्यक्ष पाहिलेले नागरीक सांगत असले तरी मागील दोन ते तीन दिवसातून राहुल अंगद मोरे यांच्या घराच्या शौचालयात एक उदमांजर हमखास दर्शन देऊन आपली चंचलता दाखविली आहे. हा परिसर गावाच्या सिमेवर घरांपासुन थोडया अंतरावर खिंडार आणि शेत-शिवार आहेत. त्यामुळे वन्य प्राणी वावराच्या दृष्टीने सोयीचा भाग आहे. प्राण्यानेही येथील रहिवाशामध्ये दहशत निर्माण केली असुन ते रात्रदिवस त्याच्यावर पाळत ठेऊत जागल्याचा पहारा देत आहेत. अशातच दि. 22 जुलै गुरुवार दुपारी एक ते दिड वाजण्याच्या सुमारास राहुल अंगद मोरे यांच्या घराच्या शौचालयात उदमांजर आणि त्याची दोन पिल्लं आल्याची खबर मिळताच गावातील नागरिकांनी तात्काळ वन्यजीव प्रेमी सचिन दिलीपराव क्षिरसागर यांना कळविले असता सचिन क्षीरसागर यांनी त्यांचे सहकारी सुरज वेदपाठक, अजय राठोड, अदिनाथ जोगी व वन विभागातील गणेश सुरवसे याना घेऊन त्या उदमांजर आणि त्यांचे दोन्ही पिल्लं मोठ्या शिताफीने पकडून बंदिस्त केले आणि त्या उदमांजर व तिचे दोन्ही पिल्लं निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप सोडून दिले.
प्राणीमित्र सचिन क्षिरसागर यांनी त्या परिसरातील नागरिकांना सदर प्रजातीबद्दल माहिती दिली, उदमांजर बद्दल खूप गैरसमज आणि अंधविश्वास लोकांमध्ये आहेत. उदमांजर गाडलेले मुडदे उकरून खाते असा गैरसमज लोकांमध्ये होता, उदमांजर हा प्राणी प्रामुख्याने रात्री वावरतो, जंगलात बीळ करून राहणारा हा प्राणी सस्तन व मांसाहारी प्राणी असून, उंदरासारखे लहान प्राणी, पक्षी, कीटक हे त्याचे खाद्य आहे. पाणी किंवा शिकारीच्या शोधत उदमांजर बाहेर पडतो, उंदीर खात असल्यामुळे एकप्रकारे उदमांजर शेतकऱ्याचा मित्रच आहे असे प्राणीमित्र सचिन क्षिरसागर यांनी सांगितले.