महात्मा फुले महाविद्यालयात टिळक जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल नेते लेखक, संशोधक, संपादक तथा भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती येथील महात्मा फुले महाविद्यालयात साजरी करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व प्राध्यापकांनीही लोकमान्य टिळक यांना पुष्प वाहून अभिवादन केले.
याप्रसंगी डॉ. बब्रुवान मोरे यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्याची माहिती आपल्या भाषणातून दिली. तसेच अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन आज समाजाला लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारांची गरज असल्याचे मत प्रतिपादन केले. याच कार्यक्रमात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या कार्यालय विभागातर्फे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. त्यासाठी कार्यालयीन प्रमुख प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे , चंद्रकांत धुमाळे, शिवाजी चोपडे, वामन मलकापूरे, चंद्रकांत शिंपी आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. पांडुरंग चिलगर यांनी तर आभार प्रशांत डोंगळीकर यांनी मानले. यावेळी कोरोनाचे नियम पाळून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.