रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघ निवडणूक:तळेगावकरांच्या मानसपुत्राने महाविकास आघाडीला दिला हाबाडा !

0
रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघ निवडणूक:तळेगावकरांच्या मानसपुत्राने महाविकास आघाडीला दिला हाबाडा !

उदगीर (एल पी उगिले)
उदगीर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ हा स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांनी स्थापन केला आहे. या खरेदी विक्री संघाचे नाव उदगीर तालुका असले तरी देवणी, जळकोट, चाकूर आणि उदगीर या चार तालुक्यांमध्ये मतदार विभागलेले आहेत. देवणी, जळकोट, चाकूर हे नवीन तालुके होण्यापूर्वी हा मतदार संघ स्थापन झाला असल्यामुळे याची व्यापकता मोठी आहे. या खरेदी विक्री संघास विद्यमान चेअरमन भरत चामले यांनी स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघ असे नामाभिधान करून घेतले आहे. त्यानंतर आता या खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुका लागल्या आहेत. या निवडणुकांसाठी माजी मंत्री तथा विद्यमान आ. संजय बनसोडे आणि सहकार महर्षी भगवानदादा पाटील तळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे पॅनल बनवून तयारीनिशी मैदानात उतरले. प्रतिस्पर्धी पॅनल मध्ये महाविकास आघाडीतून गोळाबेरीज करून पॅनल उभे केले, मात्र नामांकन अर्जावर आक्षेप नोंदवल्यानंतर तब्बल दहा उमेदवारांचे अर्ज नामंजूर ठरले आहेत. विशेष म्हणजे हे दहाच्या दहा महाविकास आघाडीच्या पॅनल मधील उमेदवार आहेत.
महाविकास आघाडीच्या पॅनल मधील एकमेव उमेदवार व्यंकटराव पाटील अवलकोंडेकर यांचा अर्ज वैध ठरला आहे. एका अर्थाने निवडणुकीमध्ये मतदानापूर्वीच महायुतीच्या पॅनलने विजय संपादन केला, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
महाविकास आघाडीची ताकद उदगीर विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. काही अंशी त्याला पक्षातील वरिष्ठ नेते जबाबदार असल्याचे बोलले जाते. तर काही प्रमाणामध्ये कार्यकर्ते विविध योजनेचे आणि गुत्तेदारीचे लाभार्थी बनत असल्यामुळे महायुती पुढे नांगी टाकत असल्याचे चर्चिले जात आहे.
या सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुका होत असून 13 जागेसाठी सध्या 19 अर्ज वैध ठरले आहेत.
सर्वसाधारण सोसायटी प्रतिनिधी गटामधून नवाडे बाळासाहेब अण्णाराव, हारमुंजे किशनराव बापूराव, मोरे विठ्ठल पंढरीनाथ, पाटील शंकरराव रामचंद्रराव, मुळे विठ्ठल दिगंबर, बिरादार रामराव व्यंकटराव, बिरादार विजयकुमार इरवंत, गंगनबीडे धनाजी सतबा तसेच महिला सोसायटी प्रतिनिधी मध्ये पाटे आशा सतीश आणि देवणे उदयमाला शाहूराज यांचे अर्ज शिल्लक आहेत. सर्वसाधारण व्यक्तिगत प्रतिनिधी मध्ये पाटील व्यंकटराव नामदेवराव, पाटील प्रभाकर व्यंकटराव, पाटील बाळासाहेब माधवराव, काळे बाबासाहेब शेषेराव, हजारे तानाजी मारुतीराव, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी मध्ये एकमेव अर्ज सोनकांबळे वसंत नारायण यांचा शिल्लक आहे. तसेच विमुक्त व भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यामध्ये देखील एकमेव अर्ज पवार मारुती पोमा यांचा शिल्लक आहे. तसेच इतर मागासवर्गीय मतदार संघातून विद्यमान चेअरमन चामले भरत तुकाराम यांचे दोन अर्ज शिल्लक आहेत.
महाविकास आघाडीच्या गटाकडून सर्वसाधारण सोसायटी प्रतिनिधी गटातील कैलास पाटील, बसवराज पाटील, बालाजी कारभारी, वीरभद्र पाटील, हनुमंत मुंडे तर महिला सोसायटी प्रतिनिधी गटातील शांताबाई माने, दैवशाला भांगे तसेच सर्वसाधारण व्यक्तिगत प्रतिनिधी गटातील सोपानराव ढगे, नारायणराव बिरादार तर इतर मागास प्रवर्गातील सुमित्रा मुस्कावाड यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी एस नांदापूरकर यांनी दिली आहे.
उमेदवारी अर्ज परत घेण्याची तारीख 14 मे पर्यंत आहे. तर 25 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर लगेच त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकाकडे चारही तालुक्याचे लक्ष लागले होते, मात्र उमेदवारी अर्ज नामंजूर झाल्यामुळे महाविकास आघाडीतील उत्साह पूर्णपणे मावळला आहे. अशी चर्चा राजकीय गटात चालू आहे.
स्व. रामचंद्र पाटील तळेगावकर हे विद्यमान चेअरमन भरत चामले यांना आपला मानसपुत्र मानत होते, त्यामुळेच आपल्या स्वतःच्या मुलाऐवजी भरत चामले यांना त्यांनी चेअरमन पदाची संधी दिली. आपल्या गुरुचे नाव कायम आजरामर राहिले पाहिजे. या भावनेतून भरत चामले यांनी उदगीर तालुका खरेदी विक्री संघाला स्व.रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघ असे नामकरण करून घेतले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!