लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, 20 वर्ष सश्रमकारावासाची शिक्षा

उदगीर (एल.पी.उगीले) एका अल्पवयीन तरुणीवर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि वीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन अंतर्गत एका पिढीत तरुणीवर आरोपी बालाजी सोनकांबळे यांनी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला होता. त्या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर एम कदम यांनी आरोपीला वीस वर्षे सश्रम कारावास व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दिनांक 8 डिसेंबर 2019 रोजी या घटनेतील मुलीने सदरील प्रकरण तिच्या आजीला सांगितले होते. आजीने वाढवणा पोलीस स्टेशन येथे जाऊन या संदर्भात तक्रार नोंदवली होती. सदरील तक्रारीचे गांभीर्य विचारात घेऊन पोलीस उपनिरीक्षक एस पी जोंधळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला होता.सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणाची सुनावणी उदगीर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये करण्यात आली. या सुनावणी दरम्यान सरकार पक्षाच्या वतीने बारा साक्षीदाराची नोंद करण्यात आली होती. सरकारी वकील यांनी केलेला युक्तिवाद, साक्षीदारांनी दिलेली साक्ष व न्याय वैद्य अहवाल विचारात घेऊन उदगीर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर एम कदम यांनी आरोपीला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4 अन्वये वीस वर्ष सश्रम कारावास तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच कलम 6 अंतर्गत वीस वर्षं कारावास तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास, तसेच कलम 8 अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम करावा. तसेच कलम 12 अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व रुपये 5000 दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदरील शिक्षाही आरोपीने एकत्रित भोगावयाच्या असून दंडाची रक्कम पिढीतेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहे. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने विधीज्ञ शिवकुमार गिरवलकर यांनी काम पाहिले त्यांना कोर्ट भैरवी करिता राज मोहम्मद शेख यांनी सहकार्य केले.