यशस्वीततेची हमी देणारे पुस्तक म्हणजे यु कॅन विन हे होय. – कु. राजनंदिनी बेंडकुळे

उदगीर (एल.पी.उगिले) शिक्षण,अनुभव आणि परिसर (परिस्थिती) याबरोबरच इच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त या गोष्टी यश-अपयशाला कारणीभूत ठरतात. यश म्हणजे सुख आणि अपयश म्हणजे दुःख असा सर्वसाधारण समज आहे. यश म्हणजे अंतिम उद्दिष्टांची प्राप्ती होय, परंतु अपघाताने यशस्वी होणाऱ्यांचे आयुष्य दुःखमय बनते. आपली नकारात्मकता हे दुःख तर सकारात्मकता हे सुखप्राप्तीचे कारण आहे. नकारात्मकतेत बुद्धि भ्रष्ट होते. जे आपल्यातली नकारात्मकता काढून टाकून समृद्ध आणि समाधानी जीवन जगण्यासाठी सक्षम बनवते, यशाचे स्वप्न पाहण्यापासून ते यशापर्यंत घेऊन जाते व जगण्याच्या उद्देशाची जाणीवच नाही तर यशाची हमी देते. असे पुस्तक म्हणजे यु कॅन विन हे होय. असे मत कु. राजनंदिनी सीमा बाळासाहेब बेंडकुळे हिने व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात या क्रमांतर्गत संपन्न झालेल्या विशेष बालवाचक संवाद 337 मध्ये इयत्ता नववीत शिकणारी कु. राजनंदिनी सीमा बाळासाहेब बेंडकुळे हिने शिव खेरा लिखित यु कॅन विन या जगप्रसिद्ध व लोकप्रिय साहित्यकृती वर इंग्रजी व मराठीतून अत्यंत प्रभावी असा संवाद साधला. यावेळी बोलताना ती म्हणाली, यश म्हणजे अंतिम उद्दिष्टांची प्राप्ती होय, असे सांगणारे हे पुस्तक साध्य, साधन व यशस्वीता या तीन भागांमध्ये विभागलेले आहे. या पुस्तकातली तत्वे सार्वत्रिक असून ते शाश्वत सत्य आहेत. वृत्तीमध्ये सकारात्मकता निर्माण करणे, आश्वासनाचे वचनबद्धतेत रुपांतर करत आत्मविश्वास वाढवून इच्छित बदल घडवून आणते. आपल्यातल्या क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी या पुस्तकात सकारात्मकतेच्या सात पायऱ्या सांगितलेल्या आहेत. असे सांगत आपले जीवन समृद्ध बनवण्याचा मार्ग दाखवून दिलेला असल्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे व त्याच्यावर चर्चा आणि अनुकरणही करावे असे सांगितले.
यानंतर झालेल्या चर्चेमध्ये कु. प्राजक्ता भांगे, कु. समृद्धी स्वामी, कु. अग्रिता विश्वनाथे, कांता कलबुर्गे, सुरेश शिंदे, मोहन निडवंचे, डॉ.नामदेव खंडगावे, अर्चना पैके व सुबोध आंबेसंगे यांचेसह अनेकांनी सहभाग नोंदवला. कु. राजनंदिनीचे कौतुकही केले. यानंतर अध्यक्षीय समारोप करताना सीमा बेंडकुळे म्हणाल्या की, जिथे स्वप्न एक वर्षाचे असेल तिथे फुले जोपासा, जिथे स्वप्न दहा वर्षाचे आहे तिथे झाडे जोपासा आणि जिथे स्वप्न शाश्वतता असेल तिथे माणसे जोपासा हे या पुस्तकात सांगितलेले असून माझे अधुरे स्वप्न मी माझ्या मुलीमध्ये पाहते, आणि ते स्वप्न पाहण्याची संधी मला वाचक संवाद या उपक्रमामुळे मिळाली. त्याबद्दल संयोजकांचे आभार मानले.
शासकीय दुध डेरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या विशेष बालवाचक संवादाचे संचलन कु. प्रतीक्षा लोहकरे हिने केले तर आभार कु. प्राजक्ता भांगे हिने मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी तुळशीदास बिरादार, आनंद बिरादार व संयोजक अनंत कदम, प्रा.मदन पाटील यांनी परिश्रम घेतले.