ग्रामीण भागातील १५० महिला बनल्या उद्योजक
लातूर (एल पी उगिले) एका बाजूला प्रचंड सुशिक्षित बेकारी तर दुसऱ्या बाजूला उदासीन झालेला तरुण आणि तरुणी अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मोठी जबाबदारी दीप प्रशिक्षण माध्यमातून यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.
ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत बुधोडा पंचक्रोशीतील महिलांना उद्योजक बनवण्यासाठी दीप प्रशिक्षण चालवले जाते. या प्रशिक्षण कार्यक्रमाची पाचवी व सहावी बॅच नुकतीच पूर्ण झाली. या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा औसा तहसील चे तहसीलदार घनश्याम आडसूळ,मातोश्री फुड्स अँड स्पायसेसचे धीरजकुमार भनगिरे, स्मिता पाटील, अविनाश शेडोळकर, प्रेरणा सुडे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र सुडे या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
ग्रामीण भागातील सुशिक्षित व होतकरू महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने, स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमातून डिजिटल साक्षरता स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकास हे चार महिन्यांचे मोफत प्रशिक्षण राबवले गेले.या प्रशिक्षणात डिजिटल साक्षरता, उद्योजकता विकास, मुलभूत संगणक कौशल्य, डिजिटल मार्केटिंग व व्यक्तिमत्त्व विकास याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. आत्तापर्यंत १५० महिलांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून उद्योजकते कडे पाऊल टाकले आहे.
दीप प्रशिक्षण केंद्रामध्ये घेतलेले प्रशिक्षण, उद्योग व्यवसाय विषयीची माहिती, जीवन कौशल्याने व्यक्तिमत्व विकास याचा आमच्या जीवनामध्ये पुढील वाटचालीस नक्कीच उपयोग करू अशी भावना यावेळी प्रशिक्षणार्थी महिलांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्रपाली कांबळे यांनी केले.तर आभार प्रा. पंचशील डावकर यांनी मांडले. या प्रसंगी कृष्णा वेदपाठक, मेहराज शेख, नीता भोसले, रिंकू सरवदे, शिवशंकर बरबडे, आकाश साबळे, हरीश काळे व प्रशिक्षणार्थी महिला आणि संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.
