वृक्षारोपण मोहीम लोकचळवळ होण्याची गरज-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर (एल पी उगिले)
लातूर जिल्ह्यातील वनक्षेत्राचे प्रमाण राज्यात सर्वात कमी आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात वृक्षारोपण मोहीम राबविली जाणार असून जिल्ह्यातील नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी यामध्ये सहभागी होवून वृक्षारोपण मोहीम लोकचळवळ बनवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी अमितराज जाधव, सहायक वनसंरक्षक मदन क्षीरसागर, वन विभागाचे श्री. बिराजदार, तसेच पर्यावरण क्षेत्रात कार्यरत विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर किंवा अंगणात झाडे लावून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे. लातूर जिल्ह्याला ‘हरित जिल्हा’ अशी नवी ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे केले.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते ग्रीन लातूर फाउंडेशन, वसुंधरा प्रतिष्ठान, आधार फाउंडेशन, वृक्ष प्रतिष्ठान, लातूर वृक्ष चळवळ, सह्याद्री देवराई प्रतिष्ठान, दि संस्कृती फाउंडेशन, खाकी फाउंडेशन आणि सायकलिंग ग्रुप यांचा वृक्षारोपणातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच आगामी वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा विशेष सन्मान करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी उपस्थितांना जिल्हाधिकारी यांनी पर्यावरण रक्षणा ची शपथ दिली.
