शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांची निवड, उदगीरात आनंद उत्सव
उदगीर (एल पी उगिले)
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्यनेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेना सचीव संजयजी मोरे यांच्या हस्ते आणि शिवसेना उपनेते आनंदराव जाधव, संपर्कप्रमुख ॲड. श्रीनिवास क्षीरसागर यांच्या सहकार्याने महिला संपर्कप्रमुख सौ. रंजना कुलकर्णी तसेच पांडुरंग बिरादार ग्राहक कक्ष संपर्कप्रमुख,आणि लातूर जिल्हाप्रमुख ग्रामीण ॲड. ब्रम्हाजी केंद्रे , शहर विभागाचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, लातूर शहराचे जिल्हाप्रमुख सचिन दाणे यांच्या उपस्थितीत उदगीर येथील शिवसेनेच्या स्थापनेपासून एकनिष्ठ राहिलेले निष्ठावंत शिवसैनिक तथा माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांची लातूर जिल्ह्याच्या उपजिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र बाळासाहेब ठाकरे भवन मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले.
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे त्या पदाला न्याय देत शिवसेनेची ताकद लातूर जिल्ह्यात वाढवण्याच्या दृष्टीने सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन, युद्धपातळीवर काम करू. असे आश्वासन याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत टेंगेटोल यांनी दिले आहे. शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. विशेषतः तरुणांमध्ये शिवसेनेबद्दल विशेष आकर्षण आहे. त्या सर्व तरुणांना एकसंघ करण्यासाठी आपण निश्चित जीवाचे रान करू, असेही त्यांनी सांगितले. आपल्याला फार मोठे पद आणि जबाबदारी दिली आहे. त्या पदाला न्याय मिळवून देत पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास आपण सार्थ करून दाखवणार. आपल्याला जसे कळते तसे आपण शिवसेनेमध्ये काम केले आहे आता उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत आहे. त्या संधीचे सोने करून संघटन बांधणीवर जोर देणार आहे. असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. आपण लातूर जिल्ह्यातील शिवसैनिकावर होणारा अन्याय सहन करणार नाही. शिवसैनिकांना न्याय मिळवून देणार. त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये आपण धावून जाणार असेही याप्रसंगी त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने कित्येक लोक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्या सर्व योजनांची माहिती खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून त्या योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचवण्याच्या कामी आमचे शिवसैनिक यशस्वी होतील, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे.
संघटन कुशल नेतृत्व असलेल्या चंद्रकांत टेंगेटोल यांना ही संधी मिळाल्यामुळे उदगीर परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या उत्साहाने आनंदोत्सव साजरा करत आहेत.
