दहावी-बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव , डॉ. शिवाजी शिंदे यांच्या पुढाकाराने भव्य सत्कार सोहळा….

0
दहावी-बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव , डॉ. शिवाजी शिंदे यांच्या पुढाकाराने भव्य सत्कार सोहळा….

मुरुम (प्रतिनिधी ) : येथील रत्नमाला मंगल कार्यालयात गुरुवारी एक प्रेरणादायी सोहळा पार पडला. हरियाणा राज्यातील पानिपत या ठिकाणी क्षेत्रीय प्रबंधक या पदावर कार्यरत असलेले डॉ. शिवाजी शिंदे यांच्या वतीने दिवंगत सिद्राम गंगाराम शिंदे (गुरुजी) यांच्या १० व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अर्दाळे, पोलीस उपनिरीक्षक डी. डी. गव्हाणे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, धम्मचारी धम्मभूषण राम कांबळे, प्रमोद कुलकर्णी, मनोहर शिंदे, गंगाधर शिंदे, शिवाजी कवाळे, प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले, पत्रकार महेश निंबरगे, डॉ. खाजालाल ढोबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. शिवाजी शिंदे यांना नुकतीच युगांडा येथील आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त, भारत सरकारच्या डाक विभागाकडून पाच रुपयाचे तिकीट जाहीर, महाराष्ट्र पत्रकार संघाचा राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार मान्यवर व पत्रकारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभात सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले. गुण हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट नाहीत, तर उत्तम माणूस होणे हे खरे शिक्षण आहे. मानवतेचे भान ठेवून विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारत, कोणत्याही सेवेच्या क्षेत्रात सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे सामूहिक मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. स्पर्धात्मक युगात आत्मभान, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि समाजाभिमुख कार्यशीलता विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन भुजबळ यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये आशावादाची नवी ऊर्जा फुंकली. “यश मिळवताना प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी आणि सामाजिक जाणीव या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपण ज्या क्षेत्रात काम कराल, तेथून समाज बदलू शकतो. केवळ मोठे पद किंवा अधिकार नव्हे, तर समाजासाठी काही सकारात्मक देण्याची वृत्ती बाळगली पाहिजे,” असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अजिंक्य मुरुमकर यांनी तर आभार तात्यासाहेब शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सचिन शिंदे, वसंत शिंदे, धनराज शिंदे, ज्योतीराम शिंदे, दत्ता खरटमल, वैभव कटके आदींनी मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, खास डॉक्युमेंट फाईल, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या आई-वडिलांसह सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुरुम शहरात एक सकारात्मक व उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!