महापुरुषांमुळे आपणास स्वाभिमानाने जगता आले – प्रा. डॉ. राजकुमार मस्के
अहमदपूर (गोविंद काळे) : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुष आपल्यासाठी चंदना प्रमाणे झिजले म्हणून आपण स्वाभिमानाने उभे राहू शकलो,बोलू शकलो त्यांचे स्मरण करणे, अभिवादन करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन लसाकमचे माजी प्रदेशाध्यक्ष थोर विचारवंत प्रा.डॉ.राजकुमार मस्के यांनी केले. येथील क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ५२व्या स्मृतिदिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्ती,गुणवंत विद्यार्थी व नुतन तालुका कार्यकारणीचा सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. २५ जुलै रोजी शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती गंगासागर जाभाडे, तर व्यासपीठावर जेष्ठ विधिज्ञ ॲड.आर.एस.वाघमारे, दलित मित्र उत्तमराव माने, कवी तुकाराम हारगिले, शिवाजीराव जंगापल्ले, डि.जी.वरवटे, अण्णाराव सुर्यवंशी, धनराज सुर्यवंशी, बालाजी जंगापल्ले, ज्ञानोबा इप्पर, शोभाताई आकरूपे, सविता वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ.मस्के म्हणाले की, जगातील संपुर्ण विद्यापीठात अण्णाभाऊच्या साहित्याचा अभ्यास केला जातो. एकही दिवस शाळा न शिकलेले अण्णाभाऊ यांनी लोकांना शिकविण्याचे काम केले. ते त्यांच्याकडील प्रतिभेमुळे! प्रतिभेला जात धर्म नसतो. यामुळेच अण्णाभाऊंना नतमस्तक व्हावे लागते. याप्रसंगी ग्यानोबा घोसे(शिक्षण)अनिल मकापल्ले(उद्योग),उदय गुंडीले(पत्रकारिता), डाॅ. वैभव आकरूपे, ॲड. आशिष वाघमारे,ॲड.राहुल वाघमारे(वकिली),रामनाथ पलमटे, आशिष तोगरे, सुनिल डावरे, सुभाष गुंडीले, मुकुंद वाघमारे (राजकिय) आदी क्षेत्रातील मान्यवरांचा व दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लसाकमचे जिल्हा प्रवक्ते नरसिंग सांगवीकर यांनी तर आभार लसाकमचे तालुकाध्यक्ष राजकुमार गोंटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंकुश पोतवळे, विश्वांभर जिवारे,शिवाजी कांबळे, मनोज जाधव, अंबादास गायकवाड, नामदेव अर्जुने, महेश वाघमारे, इंदुमती जोगदंड आदींनी परीश्रम घेतले.