संभाजी ब्रिगेड लातूर व उदगीर आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
उदगीर (एल पी उगिले) दहावी व बारावी मध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पो. नी. राजकुमार पुजारी, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक उमाकांत उफाडे व योगाचार्य रामचंद्र गरड महाराज हे उपस्थित होते.
राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने व जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर जिल्हा अध्यक्ष राजकुमार माने यांनी केले. राजकुमार पुजारी यांनी विद्यार्थ्यांना खचून न जाता सातत्याने प्रयत्न करण्याचे, निर्व्यसनी राहण्याचे आवाहन केले. उमाकांत उफाडे यांनी विद्यार्थ्यांनी फक्त डॉक्टर, इंजिनियर न होता, विविध क्षेत्रातील संधीचा शोध घेऊन आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन केले. संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाची भूमिका त्यांनी मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष राम बोरगावकर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ठेवलेल्या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे सर्व अठरारापगड जातीचे होते. शिवराय हे समतावादी, मानवतावादी राजे होते. असा विचार त्यांनी मांडला. पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, अपयशाने खचून जाऊ नये व यशाने हुरळून जाता कामा नये. आपल्या प्रयत्नातील सातत्य कायम ठेवणे गरजेचे आहे. बौद्धिक विकास जितका महत्त्वाचा आहे, तितकाच मानसिक, शारीरिक विकास महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्या शारीरिक आरोग्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे. आई वडील म्हणतात म्हणून आपण कोणतेही करिअर करण्यापेक्षा आपल्या आवडीचे करियर आपण निवडून त्यामध्ये आपण नंबर वन झाले पाहिजे. आपण इतरांशी कधीही तुलना करू नये, आपली तुलना ही आपण आपल्याशीच केली पाहिजे. केवळ डॉक्टर, इंजिनियर होण्यापेक्षा इतर क्षेत्रात ही अनेक संधी आहेत. कला, क्रीडा, संगीत या क्षेत्रामध्ये ही आपण जाऊन आपला नावलौकिक करू शकता. असा विचार त्यांनी मांडला.
मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या संघटना सर्व समाजाला सोबत घेऊन चालतात. राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेचा विचार रुजवणाऱ्या या संघटना आहेत असे मान्यवरांनी याप्रसंगी विचार मांडले. मराठा सेवा संघाचा प्रबोधनाचा जागर सातत्याने तेवत राहिला पाहिजे असे विचार मान्यवरांनी मांडले.
याप्रसंगी उदगीर शहर व उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागातील वेगवेगळ्या माध्यमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष उत्तम फड, संभाजी ब्रिगेडचे, जिल्हा सचिव मोहनेश्वर विश्वकर्मा, जिल्हा संघटक राम रावणगावे, जिल्हा संघटक महबूब सय्यद, रामचंद्र गरड , मनोहर हिंडे, नेत्रगाव शाखा अध्यक्ष पांडुरंग बिरादार, शाखा सचिव राजेंद्र बिरादार, कालिदास नीटुरे, जमील आत्तार,तालुका उपाध्यक्ष धम्मासागर सोमवंशी, तालुका सचिव सावन तोरणेकर, तालुका कार्याध्यक्ष नरसिंग बनशेळकीकर, तालुका संघटक सुरज आटोळकर, प्रा.डॉ. अविनाश प्रभुराव पाटील,प्रा.डॉ. सुनिल यशवंतराव ढगे, प्रा.डॉ. पांडुरंग बालाजी फड,प्रा. विकास प्रभुराव पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.व आभार प्रदर्शन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब चिंचोलकर यांनी केले.
