शंकर बोईनवाड यांना आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार प्रदान
उदगीर / प्रतिनिधी : येथील साहित्यिक तथा पत्रकार शंकर बोईनवाड यांना काव्यमित्र संस्था पिंपरी चिंचवड पुणेचा ” आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार पिंपरी चिंचवड येथील तारांगण ऑडिटोरिअमच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.ज्येष्ठ लेखिका सविता जंगम, क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठान सांगली चे अध्यक्ष डॉ. प्रमोद लाड, सैन्य दलातील अधिकारी राम शिंदे, अपेक्षा मासिकाचे संपादक दत्ता उभे, रोहन पंडित सर यांचे हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लिखाण करणाऱ्या शंकर बोईनवाड यांचा ” चिव चिव चिमणी ” व ” कोल्हेवाडीचा बाजार ” ही दोन बालकवीतासंग्रह व “आदर्श नगरीचा राजू ” ही किशोर कादंबरी अशी तीन पुस्तके प्रकाशीत आहेत. त्यांच्या साहित्य कृतीला परिवर्तन साहित्य संस्था नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिवचा परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार, श्री. जयभवानी भक्तगण व सांस्कृतिक कला मंडळ रांझणी ता. पंढरपूर जि. सोलापूरचा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार, संत गाडगेबाबा विचारमंच ओतूर ता. जुन्नर जि. पुणेचा राज्यस्तरीय बाल साहित्य पुरस्कार, नांदेड येथील यशवंतराव चव्हाण विचार मंचचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, हिंगोलीचा संत नामदेव राष्ट्रीय बाल साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांचे नांदेड आकाशवाणीवरून अनेक वेळा काव्यवाचन प्रसारित झाले आहे. भव्य अशा या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शारदा पवार यांनी केले तर राजेंद्र सगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
