उदगीरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला म्हणे कोट्यावधीचा घोळ !!कोणी कोणी खेळला भ्रष्टाचारी खेळ ?

0
उदगीरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला म्हणे कोट्यावधीचा घोळ !!कोणी कोणी खेळला भ्रष्टाचारी खेळ ?

उदगीर (एल. पी. उगीले) उदगीरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण कामकाजामध्ये जशी जशी प्रगती होत गेली, तसा तसा त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वेळोवेळी करण्यात आला. सत्ता कोणाची हे महत्त्वाचे नव्हते, मात्र सत्ताधारी कोण? हे डोळ्यासमोर ठेवून व्यक्ती सापेक्ष राजकारण केले गेले, आणि मराठवाड्यातील एक नामांकित असलेली उदगीरची कृषी उत्पन्न बाजार समिती भ्रष्टाचाराचा चक्रव्यूह आणि गैरकारभाराच्या चर्चेत गुरफटली गेली.
तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात सभापती, सचिव आणि काही संचालकांनीही मोठा गैरव्यवहार केल्याचा प्रकार लेखापरीक्षकाच्या अहवालातून समोर आला आहे. विशेष म्हणजे या गैरकारभाराच्या अनुषंगाने संबंधितांना जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांनी नोटिसा बजावून खुलासाही मागवलेला होता. मात्र याप्रकरणी नेमकी काय कारवाई करण्यात आली? किंवा कोणत्या आरोपावर पांघरून घालण्यात आले? यासंदर्भात स्पष्टीकरण मिळू शकले नाही. हा सर्व प्रकार गुलदस्त्यातच ठेवण्यामध्ये अनेकांना धन्यता वाटत असल्याची चर्चा आडत बाजारात सुरू आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळातील अर्थात सन 2021-22, आणि 2022-23 या आर्थिक वर्षात तत्कालीन सभापती व काही संचालकांनी तत्कालीन सचिवाला हाताशी धरून बराच काही गैरकारभार केला आणि या गैरकारभारासाठी संगणमत केले, आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असेही आरोप व्यापारी वर्गातून केले जात आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन 2021-22 आणि 22- 23 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षणाचे आदेश पण महासंघ महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संचालकांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी काढले होते. व यात लेखापरीक्षक म्हणून जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग – 1, सहकारी संस्था लातूरचे यु एल पवार यांची उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर चे लेखा परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या दरम्यानच्या काळात लेखापरीक्षक पवार यांनी लेखा परीक्षणाचे काम पूर्ण करून सन 2021- 22 आणि 22 – 23 या आर्थिक वर्षात तत्कालीन सभापती व काही संचालकांनी तत्कालीन सचिव यांच्याशी संगणमत करून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले असून, याप्रकरणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक पवार यांनी तत्कालीन सभापती, सचिव व संचालक यांना 3 ऑक्टोबर 2023 रोजी नोटीसा बजावल्या होत्या. तसेच संबंधितावर गैरव्यवहाराचा ठपका ठेवत सभापती, सचिव आणि संचालक मंडळ या गैरव्यवहाराला जबाबदार असल्याचेही नमूद केले होते. साधारणतः या गैरव्यवहाराची सदरची रक्कम सात दिवसाच्या आत भरणा करावी. व याबाबतचा समर्पक व कागदोपत्री पुराव्यानिशी या कार्यालयास सात दिवसाच्या आत सादर करावे. आपला खुलासा समर्पक व कागदोपत्री पुराव्यासह न असल्यास संबंधितांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल. असा इशाराही सदरील नोटीसमध्ये देण्यात आला होता. पण या प्रकरणाची कारवाई काय झाली? यासंदर्भात उदगीर तालुक्यातील व्यापारी, शेतकरी अनभिज्ञ असल्याची चर्चा आहे.

चौकट……..

उदगीर बाजार समितीच्या विकासाचे टप्पे…..

खरे तर प्रशासकीय कालावधीमध्ये उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती डबघाईला आली होती. ती इतकी आर्थिक दृष्ट्या कमजोर ठरली होती की, कर्मचाऱ्यांच्या वेतनाची सुद्धा तरतूद करता येत नव्हती. मध्यंतरीच्या काळात गोविंदराव भोपनिकर यांनी बैल बाजारासाठी 100 एकर जमीन खरेदी करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र राजकीय हेव्यादाव्यातून तो प्रस्ताव त्यावेळेस तसाच पडून राहिला. त्यानंतर प्रशासकाच्या कालावधीमध्ये पुन्हा या कृषी उत्पन्न बाजार समितीला ग्रहण लागले होते.
मात्र निवडणुका झाल्या आणि तत्कालीन आमदार स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांनी बाजार समितीच्या हितासाठी तसेच कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठी लोक कल्याणकारी योजना राबवता आल्या पाहिजेत. अशी दूरदृष्टी ठेवून बाजार समिती काटेकोरपणे चालली पाहिजे. अशी भूमिका घेऊन बाजार समितीच्या एकूण कामकाजावर अंकुश ठेवला आणि पाहता पाहता ही बाजार समिती कोट्यावधी रुपयाची रक्कम ठेवी म्हणून ठेवण्यास समर्थ झाली. आणि त्या विकासाच्या टप्प्यामध्येच हळूहळू प्रगती होत चाललेली आहे. आज ही बाजार समिती महाराष्ट्राच्या अग्रगण्य बाजार समितीमध्ये गणली जात आहे.

चौकट……
भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालली……

लोकहितापेक्षा स्वार्थ महत्त्वाचा ठरू लागला किंवा राजकीय हस्तक्षेठरू वाढला की संस्थेला ग्रहण लागते, बाजार समिती ही व्यापारी, हमाल, मापाडी आणि शेतकऱ्यांच्या विकासाची अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. मात्र या संस्थेला राजकीय अड्डा बनवून काही राजकारणी जेव्हा राजकीय डावपेच खेळायला लागतात, तेव्हा अशा संस्था म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. अशी चर्चा उघड उघड व्हायला सुरुवात होत असते. तशाच चक्रव्ह्यूवात उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती हळूहळू गुरुफटत गेली की काय? अशीही चर्चा आता जोर धरू लागली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!