पोस्ते पोद्दार लर्न स्कूलचा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा
उदगीर (एल पी उगिले) :
उदगीर शहरातील नामांकित पोस्ते पोद्दार लर्न स्कूलचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 2018 साली अवघ्या 350 विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या या संस्थेने केवळ सात वर्षांत 2000 पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करत आपला शैक्षणिक वटवृक्ष मजबूतपणे उभा केला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुरज काशिनाथ पोस्ते, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी धमनसुरे , तसेच रवींद्र हसरगुंडे, रामभाऊ मोतीपवळे, श्रीपाद सीमंतकर, सिद्धार्थ सूर्यवंशी, बिबीशन मद्देवाड ,माधव रोडगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व आणि केक कापून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून, “शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नव्हे, तर व्यक्तिमत्व विकासासाठी, सामाजिक भान वाढवण्यासाठी आणि जीवनशैली समृद्ध करण्यासाठी अत्यावश्यक आहे,” असे ठाम मत व्यक्त केले. त्यांनी शिक्षणाच्या महत्वावर भर देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
संस्थेचे अध्यक्ष सुरज पोस्ते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “उदगीर शहराचे शिक्षण क्षेत्रात हरवलेले नाव पुनर्प्राप्त करण्याच्या हेतूने 2018 साली या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची ताकद आपण पाहतोय. आज हे रोपटं वटवृक्ष झालं, याचा मला अतिशय आनंद आहे. यामागे माझ्या शिक्षकवर्गाचा, निष्ठावान स्टाफचा, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या पालकांचा आणि सर्व उदगीरकरांचा मोठा वाटा आहे. यांच्यामुळेच आज हे यश शक्य झाले.”
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले. पोस्ते पोद्दार लर्न स्कूल ने केवळ संख्येच्या बाबतीतच नव्हे तर गुणवत्ता, नियोजन व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीतही एक आदर्श निर्माण केला आहे.
उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रात नवसंजीवनी निर्माण करणाऱ्या या संस्थेला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
