सोमनाथपूर येथील श्री दत्त प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरण
उदगीर (एल पी उगिले)
कारवाँ फाउंडेशन, उदगीर या सेवाभावी संस्थेच्या वतीने व कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम श्री दत्त प्राथमिक विद्यामंदिर, सोमनाथपूर, उदगीर येथे १९ जुन २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात श्री दत्त प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील १२५ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमास बिदर येथील कार्यरत पोलीस उपनिरीक्षक महेश आडे, डॉ. लक्ष्मण जाधव (आरोग्य अधिकारी, औराद), डॉ. शिवशंकर वानोळे व डॉ. सागर खटके, कारवाँ फाऊंडेशन उदगीर चे प्रमुख ओंकार गांजुरे, गुरुप्रसाद पांढरे , दत्त प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. पोतदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी महेश आडे यांनी विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम करून व अभ्यासातील सातत्यत ठेवून ध्येय पूर्ण करावीत असे मार्गदर्शन केले. डॉ. लक्ष्मण जाधव यांनी शिक्षकांचे व शिक्षणाचे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व पटवून दिले. डॉ. शिवशंकर वानोळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनातील दैनंदिन सवयी, शिस्त, चांगला आहार, आरोग्य, अभ्यास,बौद्धिक विकास साधण्या साठी मार्गदर्शन केले.
कारवाँ फाऊंडेशन, उदगीर व कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक जनजागृती, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्याचे कार्य केले जाते. सदरील कार्यक्रम हा कारवाँ फाऊंडेशनच्या ८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजन करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन गुरुप्रसाद पांढरे, आनंद कंठे, शुभम पाटील, शाकिब सोफी, श्री दत्त प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे सर्व शिक्षक व कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या पार पाडले.
