महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नूतन कार्यकारिणीची बैठक संपन्न
उदगीर (एल पी उगिले) – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नूतन कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर बैठक शैक्षणिक वर्ष 2025-26 या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये महाविद्यालयातील क्रीडा विषयक योजना, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नवीन शैक्षणिक धोरणानुसार परिसरातील शैक्षणिक तज्ञ तसेच शाळा महाविद्यालय यांच्याशी समन्वय, नीट आणि जेईई सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रयत्न, विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे निर्णय घेण्यात आले. संस्थेच्या विकासाचा व्यापक आराखडा या बैठकीत तयार करण्यात आला. बैठकीस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. ही बैठक अत्यंत सकारात्मक, सुसंवादपूर्ण व समन्वयाच्या वातावरणात पार पडली. संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त केला.
