योगामुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका कमी होतो – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
योगामुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका कमी होतो - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : नियमित योगा आणि प्राणायाम केल्यामुळे शरीराची लवचिकता आणि संतुलन साधले जाते. तसेच मानसिकदृष्ट्या तणाव कमी होऊन मन एकाग्रता साधली जाते. शिवाय हृदयरोग आणि मधुमेह या सारख्या जीवघेण्या आजारांचा धोका कमी होतो,असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य,ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते. तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगाचार्य डॉ. बब्रुवान मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील म्हणाले की, आपल्या देशाला बळकट करायचा असेल तर आरोग्य संपन्न पिढी निर्माण होणे आवश्यक आहे आणि ती केवळ योग्य दिनचर्येमुळे आणि योगा प्राणायामामुळे होऊ शकते असेही ते म्हणाले. यावेळी योगाचार्य डॉ. बब्रुवान मोरे यांनी ही योगाचे महत्त्व सांगून निवडक प्राणायाम व योगाचे अप्रतिम दीड तासात प्रात्यक्षिक केले व करूनही घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संयोजक व क्रीडा संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे यांनी केले. तर, आभार उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
