विनाविलंब व विनाअट पीक कर्ज द्या;अन्यथा ‘बँकांच्या शाळा’ उघड करू!शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा लीड बँकेला इशारा

0
विनाविलंब व विनाअट पीक कर्ज द्या;अन्यथा 'बँकांच्या शाळा' उघड करू!शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा लीड बँकेला इशारा

लातूर : हमीदार, सिबिल स्कोअर, मागील थकबाकी व अन्य तांत्रिक कारणे पुढे करीत लातूर जिल्ह्यात बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाअट, विना विलंब तात्काळ पीक कर्ज वाटप करावे, अन्यथा ‘बँकांच्या शाळा’ उघड करू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लीड बँकेला सोमवारी (दि.२३) दिला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी, बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लातूरच्या अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांची सोमवारी भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ बँकांमार्फत पीक कर्जे द्यावीत, अशी आग्रहाची मागणी केली. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यातील शेतकरी सध्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहेत. नैसर्गिक आपत्ती, हमीभावाचा अभाव, वाढता उत्पादन खर्च, आणि पीक विम्यातील धरसोडीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशा कठीण काळात त्याला आधार देणारे एकमेव साधन म्हणजे पीक कर्ज जे वेळेवर, सुलभ आणि विनाअट मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

राज्य शासनाकडून बँकांना त्वरित पीक कर्ज मंजुरीचे निर्देश असतानाही आपल्या शाखेमध्ये शेकडो शेतकऱ्यांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. हमीदार, सिबिल स्कोअर, मागील थकबाकी व अन्य तांत्रिक कारणांचे दाखले देत बँकांकडून कर्ज वितरण टाळले जात आहे. मुख्य व विभागीय शाखांकडे अर्ज फॉरवर्ड करून वेळकाढूपणा केला जातो आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे अग्रणी बँकेच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. याबाबत सर्व बँकांना तात्काळ सूचना देत पीक कर्ज वाटप करावे अन्यथा शिवसेना जिल्ह्यातील ‘बँकांची चाललेली शाळा’ उघड करेल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.

तात्काळ कार्यवाही करावी…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सदैव संघर्ष करत आहे. या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक, महानगरप्रमुख सुनील बसपुरे, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, शहरप्रमुख विष्णूपंत साठे, तालुकाप्रमुख परमेश्वर सूर्यवंशी, किसन समुद्रे, सुरज बाहेती, श्रीराम कुलकर्णी , मुनीर पठाण, मारोती सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!