त्याग आणि संस्काराचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे हरिश्चंद्र गुरुजी – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

0
त्याग आणि संस्काराचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे हरिश्चंद्र गुरुजी - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

त्याग आणि संस्काराचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे हरिश्चंद्र गुरुजी - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

अहमदपूर (गोविंद काळे) : काही माणसं जन्माने मोठी होतात, तर काही माणसं कर्माने. हरिश्चंद्र गुरुजी हे स्वतःच्या कर्माने मोठे झाले होते. वयाच्या ३२ व्या वर्षापासून त्यांनी घरादाराचा त्याग करून स्वामी दयानंद सरस्वती प्रणित आर्य समाजाची संन्यास दीक्षा घेतली आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात हजारो शिष्य घडविले. गुरुजी एका जागी कधीच थांबत नसत. समाजाचे भले व्हावे ही त्यांची तळमळ होती. आर्य समाजाच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. स्वामी श्रद्धानंद सरस्वती उर्फ हरिश्चंद्र गुरुजी म्हणजे त्याग आणि संस्काराचे मूर्तीमंत प्रतीक होते, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक तथा समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील आर्य समाजाचे श्रद्धास्थान हरिश्चंद्र गुरुजी यांचे नुकतेच औराद ता. उमरगा जि. धाराशिव येथे वयाच्या १०८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, माझ्या वैयक्तिक जडणघडणीमध्ये आर्य समाज आणि हरिश्चंद्र गुरुजी यांचा सिंहाचा वाटा असून, आज जो काही मी आहे तो या दोघांमुळेच असून, महाराष्ट्रात आणि देश विदेशात गुरुजींनी असे हजारो विद्यार्थी घडविले.
विद्यार्थ्यांमधील बौद्धिक चुणूक ओळखून ते अशा विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक भेटत असत आणि त्या विद्यार्थ्यांना तुम्ही श्रेष्ठ बना, तुम्ही बुद्धिमान, बलवान बना आणि आपल्या समाजाची, राष्ट्राची सेवा करा असा प्रेरणादायी संदेश देत असत. गुरुजींच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे असेही ते म्हणाले.
या शोक सभेचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन एन.एस.एस. विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते. शेवटी सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून हरिश्चंद्र गुरुजी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!