मानवी संसाधन व्यवस्थापनात महात्मा फुले महाविद्यालयाला पेटंट प्राप्त..!

0
मानवी संसाधन व्यवस्थापनात महात्मा फुले महाविद्यालयाला पेटंट प्राप्त..!

मानवी संसाधन व्यवस्थापनात महात्मा फुले महाविद्यालयाला पेटंट प्राप्त..!

महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षात उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्या संशोधनाचा गौरव

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालय हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली यावर्षी आपला रौप्य महोत्सव साजरा करीत असून, या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाला भारत सरकारने ‘ मानवी संसाधन व्यवस्थापन उपकरण ‘ या विषयात पेटंट बहाल करून अनोखी भेट दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक तथा अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दुर्गादास चौधरी यांनी भारत सरकारकडे मागील मार्च महिन्यात ‘ मानवी संसाधन व्यवस्थापन उपकरण ‘ या विषयावर व्यापक संशोधन आराखडा सादर केला होता. यामध्ये त्यांना डॉ. शिरीष गावडे, डॉ. कमल पोले, डॉ. गौरव शुक्ला, डॉ. कैलास पाटील, डॉ. प्रियंका नानोरकर, डॉ. प्रिन्सकुमार मिश्रा आणि डॉ. देवेंद्र दगडे आदी प्राध्यापकांनी सहकार्य केले.
मानवीय संसाधनांचा व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीने उत्तम उपयोग होऊ शकतो, हे या आराखड्यातून डॉ. दुर्गादास चौधरी यांनी दाखवून दिले असून, त्यांच्या या संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने मान्यता बहाल केली असून, दिनांक १२ जून २०२५ रोजी पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे.
या गौरवास्पद कामगिरीबद्दल प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते, शाल, पुष्पगुच्छ देऊन उपप्राचार्य तथा पेटंट प्राप्त प्रोफेसर डॉ. दुर्गादास चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक संस्था, बॅंक, कंपनी असेल किंवा अन्य व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड दडपण असते. मात्र अशा वातावरणात त्यांच्याकडून कुशलतेने काम करून घेण्याची हातोटी व्यवस्थापकांना असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांकडून योग्य पद्धतीने काम करून घेऊन त्यांच्या कामाचा जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार असून डॉ. दुर्गादास चौधरी यांच्यासह सर्व प्राध्यापकांनीही संशोधनाच्या क्षेत्रात यापुढे उत्तुंग भरारी घ्यावी अशी अपेक्षाही व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले, तर आभार हभप डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!