उदगीर ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी !!मोडीत काढणार मोटरसायकलची चोरी !!
उदगीर (ऍड. एल.पी. उगीले) उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उत्कृष्ट कामगिरी करत चोरीस गेलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या 21 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी म्हणून राजकुमार पुजारी रुजू झाल्यानंतर, अनेक गुन्हे उघड होऊ लागले आहेत. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच गातेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आणि गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील दोन गुन्हे अशा पद्धतीने चार गुन्हे उघड झाले असून इतर अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणावरून हे चोरटे मोटार सायकली चोरून स्वस्तामध्ये विकून मौज मजा करायचे. मात्र त्यांना उदगीर ग्रामीण च्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्या मोटरसायकल चोरांना चांगला झटका दिला आहे.
17 मे 2025 रोजी फिर्यादी दत्तात्रय राजाराम भोसले (वय 28 वर्ष राहणार हेर) यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे गु.र. न. 288/25 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील मोटार सायकल व चोरट्यांचा शोध घेण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण शाखेला आदेश दिले होते. विशेष बाब म्हणजे अशा पद्धतीच्या इतरही काही मोटारसायकली चोरीला गेल्या असू शकतात, त्या पार्श्वभूमीवर तपास करावा. अशा पद्धतीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, तसेच उदगीरचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर यांनी ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांना सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करत ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी आपल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचारी राम बनसोडे, राजू घोरपडे, संतोष उर्फ नाना शिंदे, नामदेव चेवले, सचिन नाडागुडे, राजकुमार डबेटवार, विठ्ठल दिंडे, नजीर बागवान यांना या आणि अशा स्वरूपात झालेल्या चोरीच्या तपासाच्या संदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या होत्या. त्यावरून या गुन्हे प्रगटीकरण शाखेने युद्ध पातळीवर प्रयत्न करून गोपनीय बातमीदार नेमून, माहिती मिळवली असता संशयित आरोपी म्हणून असलम फतरूसाब शेख (रुग्णालय वय 42 वर्ष राहणार इस्लामपूर संजय नगर लातूर हा मु बिदर गेट उदगीर), असद नईम शेख (वय 41 वर्ष राहणार पेठ दरवाजा उदगीर), जब्बार नबी साब शेख (वय 55 वर्ष राहणार काझी मोहल्ला नगर लातूर), वसीम फारुख मोमीन (वय 42 वर्ष राहणार खंडोबा गल्ली लातूर) यांना ताब्यात घेऊन तपास केला असता आपण बऱ्याच मोटारसायकली चोरल्याचे त्यांनी कबूल केले.
कबुली मिळाल्यानंतर या गुन्हे प्रगटीकरण शाखेने तात्काळ त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मोटारसायकली जप्त केल्या. तब्बल 21 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून लाखो रुपयांचा मुद्देमाल पकडल्याबद्दल या पथकासोबतच उदगीर ग्रामीणच्या अधिकाऱ्यांचेही कौतुक केले जात आहे. या चांडाळ चौकडी कडून चार गुन्हे उघड झाले असून इतर अनेक गुन्हे उघड होण्याचे संकेत असल्याचे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती सांगितले आहे.
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चोरीस गेलेल्या मोटरसायकली तर सापडल्याच, त्यासोबतच जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या चोरीच्या मोटारसायकली ही सापडल्या आहेत. इतकेच नाही तर काही मोटारसायकली परराज्यातून आणले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच इतर जिल्ह्यातूनही मोटारसायकली चोरून आणल्या असाव्यात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या चारीही सराईत असलेल्या चोराकडून आणखी गुन्हे उघड होतील. अशी आशा उदगीर ग्रामीण पोलिसांना आहे.
