सैनिकी विद्यालयात कै. मलशेटृटी अप्पा पाटील नागराळकर यांचा स्मृतिदिन संपन्न
उदगीर (प्रतिनिधी)
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात उदगीर पंचक्रोशीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेले कै. मलशेटृटीअप्पा पाटील नागराळकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर येथील राज्यशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ दत्ताहरी होनराव, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख विलास शिंदे, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, प्रल्हाद येवरीकर , श्रीकांत देवणीकर हे उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात कै. मलशेटृटीअप्पा पाटील नागराळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, उदगीर पंचक्रोशीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, निर्मोही, निःस्वार्थी अप्पा म्हणून कै. मलशेटृटीअप्पा पाटील नागराळकर यांना ओळखले जाते. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील व छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांनी प्रभावित होऊन उदगीर येथे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालय यांच्या स्थापनेत मोलाचे मार्गदर्शन केले.राजकारण व समाजकारण यात विविध पदावर कार्यरत असताना कसल्याही पदाची आसक्ती ठेवली नाही.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, उदगीर पंचायत समितीचे पहिले सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले सभापती, लोकल बोर्डाचे सदस्य, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी उदगीरचे माजी अध्यक्ष म्हणून मलशेटृटीअप्पा पाटील नागराळकर यांची ओळख आहे. मलशेटृटीअप्पा पाटील नागराळकर यांनी प्रत्येक पदावर कार्य करताना आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचा अल्प परिचय व सूत्रसंचालन एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी केले तर आभार प्रल्हाद येवरीकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील महिंद्रकर, विजय कावळे, विनायक करेवाड, संतोष चामले, उज्वला वडले, मारोती मारकवाड यांनी सहकार्य केले.
